जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. पहलगाममधील हल्ल्यापूर्वी गुप्तचर संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हल्ल्याची भीती व्यक्त करणारा अहवाल सादर केला होता, असा आरोप खरगे यांनी केला आहे. यामुळे पंतप्रधानांनी त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला होता. असे म्हणत खरगे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रांची येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हटले की, देशात जे काही घडत आहे ते तुमच्या समोर आहे. २२ एप्रिल रोजी देशात एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. २६ लोक मारले गेले आणि सरकारने हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे मान्य केले आणि ते दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.
खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करताना म्हटले की, जेव्हा गुप्तचर यंत्रणा तुम्हाला सांगतात की तुमच्या संरक्षणासाठी तिथे जाणे योग्य नाही, तर तुम्ही तुमच्या गुप्तचर यंत्रणांना, सुरक्षा यंत्रणांना, पोलिसांना, सीमा दलाला का सांगितले नाही?जेव्हा तुम्ही तुमची चूक मान्य करत असता तेव्हा या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या इतक्या लोकांची जबाबदारीही तुम्ही घेतली पाहिजे. असे म्हणत त्यांनी सरकारवर घणाघात केला.