पब्जी खेळताना प्रेम जमलं, पाकिस्तानी तरूणी तिच्या चार मुलांना घेऊन भारतात प्रियकराकडे आली

गुरूवार, 6 जुलै 2023 (11:34 IST)
- अभिनव गोयल
एक छोटीशी खोली, दोन खाटा, समोर भिंतीवर सहा कप आणि सहा वाट्या, काही मसाल्यांचे डबे आणि गरजेच्या वस्तू.
 
ही खोली पाकिस्तानी नागरिक सीमा गुलाम हैदर यांचं विश्व झालं होतं. सीमा इथे तिच्या चार मुलांबरोबर गेल्या दीड महिन्यापासून सचिन मीणा यांच्याबरोबर राहत होती.
 
ग्रेटर नोएडामधील ही खोली आता रिकामी झाली आहे. घाईघाईत सीमा तिचं पैंजण आणि कानातलं मागे सोडून गेली आहे. कोड्यात टाकणाऱ्या एका प्रेमकथेचं ते एक प्रतीक म्हणून राहिलं आहे.
 
पब्जी खेळता खेळता पाकिस्तानची नागरिक असलेली सीमा गुलाम हैदर भारतात राहणाऱ्या सचिन मीणाच्या प्रेमात पडली होती.
 
ऑनलाईन गेमचा इतका प्रभाव तिच्यावर पडला की तिच्या चार मुलांना घेऊन ती व्हिसा विनाच बॉर्डर ओलांडून सचिनकडे आली.
 
मात्र आता ही प्रेम कहाणी पोलीस आणि भारतातल्या संरक्षण संस्थांच्या जाळ्यात अडकली आहे आणि दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
 
प्रश्न असा आहे की सीमा गुलाम हैदर व्हिसा नसताना भारतात पोचली तरी कशी?
 
सीमा पाकिस्तानात कुठे राहत होती? दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली कधी आणि दोघांनी दीड महिना भाड्याच्या एका खोलीत कसा काढला आणि कुटुंबाने समजावून सुद्धा सचिनने त्यांचं का काही ऐकलं नाही?
 
पब्जी गेमपासून झाली होती सुरुवात
फेब्रुवारी 2014 मध्ये सीमाचं लग्न पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात राहणाऱ्या गुलाम हैदरशी झालं होतं. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला.
 
सीमाचा नवरा गुलाम हैदर कराचीमध्ये टाईल्स लावण्याचं काम करायचे. 2019 मध्ये कामानिमित्त ते सौदी अरेबियाला गेले.
 
नवरा तिथे गेल्यानंतर सीमा एकटी पडली आणि तिचा बहुतांश वेळ पब्जी खेळण्यात जाऊ लागला. त्याचवेळी तिची ओळख उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा भागात राहणाऱ्या सचिन मीणाशी झाली.
 
सीमा सांगते, “मी दिवसातून दोन ते तीन तास पब्जी खेळायचे. सचिनशी माझी ओळख पब्जी खेळताना झाली होती.”
 
दोघांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले आणि तासनंतास एकमेकांशी फोनवर बोलू लागले. तीन वर्षं हा प्रकार सुरू होता आणि त्यांचं प्रेम अधिकच गहिरं झालं आणि सीमाने ठरवलं की तिला आता सचिन मीणाबरोबरच रहायचं आहे.
 
पहिलीच भेट झाली...
सीमा हैदरने एक मोठा निर्णय घेतला. सचिनला भेटण्यासाठी सीमाने नेपाळचा व्हिसा घेतला आणि शारजाहमार्गे ती काठमांडूला पोहोचली.
 
सचिनला अटक झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “सीमा नेपाळला आली होती. तिथे आम्ही 10 मार्चला भेटलो होतो. तिथे आम्ही काही दिवस एकत्र राहिलो आणि सीमा पाकिस्तानला परत गेली.”
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीमा सचिनबरोबर काठमांडूच्या एका हॉटेलमध्ये सात दिवस राहिली आणि परत गेली.
 
.... पण ओढ ही युगांची
पहिली भेट झाल्यानंतर सीमा परत गेली आता काहीतरी मोठी पावलं उचलणं गरजेचं होतं.
 
सीमाने पुन्हा एकदा नेपाळचा टुरिस्ट व्हिसा घेतला, मात्र यावेळी सीमाबरोबर तिचे चार लहान मुलंही होते.
 
ती शारजाहवरून नेपाळला आली आणि तिथून बसने दिल्लीला आली. पोलिसांनी सचिन आणि सीमाकडून, पोखरा, काठमांडू ते दिल्ली अशा एका बसचं तिकीटही जप्त केलं आहे.
 
ग्रेटर नोएडाचे पोलीस उपायुक्त साद मियां खान म्हणाले, “सीमा मुळची सिंध प्रांतातली आहे. ती कराचीत राहत होती. तिने युट्यूबवर व्हीडिओ पाहिला आणि ट्रॅव्हल एजंटकडून नेपाळचं तिकीट काढलं. नेपाळहून ती बसने सचिनला भेटायला आली.”
 
साद मियांनी माहिती दिली की सीमाने आता सचिनबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 
त्यांनी सांगितलं की सीमाकडे एक प्लॉट होता. भारतात शिफ्ट होण्यासाठी सीमाने तो प्लॉट बारा लाखात विकला होता.
 
एकत्र राहण्यासाठी घेतली भाड्याची खोली
सचिन उत्तर प्रदेशातल्या ग्रेटर नोएडाच्या रबुपुरा भागात राहतात. याच भागात सीमा आणि तिच्या मुलांना आपल्याबरोबर ठेवण्याची पूर्ण तयारी सचिनने केली होती.
 
सीमा येण्याच्या दोन दिवस आधी रबुपुराच्या आंबेडकर मोहल्ल्यात राहणाऱ्या गिरजेशशी संपर्क केला आणि त्याला एक खोली भाड्याने हवी असल्याचं सांगितलं.
 
गिरजेशच्या घरात अनेक भाडेकरून राहतात. दोन मजली घरातल्या पहिल्या मजल्यावर भाडेकऱ्यांसाठीच सहा खोल्या तयार केल्या आहेत. 2500 रुपये भाड्याने एक खोली त्याने सचिनला दिली.
 
गिरजेश सांगतात, “आमची खोली रिकामी होती म्हणून त्याला दिली होती. सचिन 13 मे च्या चार पाच दिवस आधी बोलून गेला होता. त्याने कोर्ट मॅरेजचं काहीतरी सांगितलं होतं आणि म्हणाला की त्याची बायको आणि मुलं राहतील. महिलेबद्दल त्याने सांगितलं की ती महिला शिकारपूरची राहणारी आहे आणि तो आमच्याच भागात रहायचा आणि त्यामुळे संशय घेण्यासारखं काही नव्हतं.”
 
एका छोट्या खोलीत सीमा आणि तिच्या चार मुलांबरोबर सचिनने रहायला सुरुवात केली. तो आसपासच्या एका दुकानात सहा हजार पगारावर काम करायचा.
 
गिरजेश सांगतात, “सीमाला तीन मुली आणि एक मुलगा होता. मुलगा सगळ्यात मोठा होता. तो आठ वर्षांचा होता आणि सगळ्यात छोटी मुलगी दोन वर्षांची असावी.”
 
सीमा हिंदू बनून रहायची
गिरजेश आणि इतर भाडेकऱ्यांना तिच्या राहणीमानाबद्दल कधी संशय आला नाही याचं कारण होतं तिचं राहणीमान
 
गिरजेशची बायको राजकुमारी सांगतात, “आम्ही तिच्याशी थोडंफार बोलायचो. जेव्हा पोलीस आले तेव्हा आम्हाला खरी परिस्थिती कळली. ती टिकली लावायची, कधी कधी भांगेत कुंकूही भरायची.”
 
या दीड महिन्यात ईदही आली, मात्र सीमावर संशय यावा असं तिने काहीही केलं नाही.
 
घरमालक सीमा आणि सचिन बिडी पिण्यावरून भांडत असत. गिरजेशच्या मते सचिनला सीमाचं बिडी पिणं आवडायचं नाही.
 
एक दोनदा भांडण बरंच टोकाला गेलं की गिरजेशने सचिनला खोली रिकामी करण्याचीही धमकी दिली होती.
 
सचिनच्या कुटुंबाला आधीपासूनच होती माहिती
सीमावर संशय न घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे सचिनचं कुटुंबसुद्धा होतं.
 
घरमालक गिरजेश सांगतात, “सचिनने खोली भाड्याने घेण्याच्या आधी आधार आणि पॅनकार्डची कॉपी दिली होती. सचिनच आई आणि वडील त्याला भेटायला आले होते. कुटुंबीय आले तर मला वाटलं सगळं ठीक आहे.”
 
सचिनचं स्वत:चं घर रबुपुरा गावातच आहे. या घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर त्याचं घर आहे. त्याचे वडील माळी म्हणून काम करतात.
 
सचिनचे वडील नेत्रपाल यांनी दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या लग्नापासून त्यांना तीन मुलं होते. त्यात सचिन दुसऱ्या क्रमांकाचा आहे. सचिनचे वडील आता दुसऱ्या बायकोबरोबर राहतात. त्यांना दोन मुलं आहेत.
 
सचिनचे काका बिरबल यांना सचिनच्या या प्रकरणाची माहिती होती. मात्र सचिनने त्यांचं काहीही ऐकलं नाही.
 
बिरबल सांगतात, “सहा महिने जुनी गोष्ट आहे. सचिन कोणाशीतरी बोलत होता. मी एकदा त्याला विचारलं की दोन दोन तास कोणाशी बोलत असतो. त्याने काही सांगितलं नाही. हे काही दिवस सुरू राहिलं.”
 
“एक दिवस मग मी त्याला पकडलं. तेव्हा सचिनने मला सांगितलं की मी पब्जी खेळतो. पाकिस्तानच्या एका मुलीशी माझं अफेअर आहे. तिला भारतात यायचं आहे. मी सचिनसमोर हात पाय जोडले आणि त्याला सांगितलं की आपण गरीब आहोत. तू हे काम करू नको, हे अतिशय वाईट काम आहे.” बिरबल सांगत होते.
 
हरियाणाहून अटक
सीमा आणि सचिनने एक जुलैला घाईघाईत सामान बांधलं आणि भाड्याची खोली सोडली.
 
पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी सांगितलं की गुप्त माहितीच्या आधारे चार जुलैला हरियाणाच्या वल्लभगढ मधून त्यांना अटक करण्यात आली.
 
या प्रकरणी सचिनचे वडील नेत्रपाल मीणा यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून दोन व्हीडिओ कॅसेट, चार मोबाईल फोन, एक सीम, चार जन्मप्रमाणपत्र अशा अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत.
 
पोलिसांनी सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांच्याविरोधात विदेशी अधिनियमाच्या कलम 14,120 आणि पासपोर्ट अधिनियम 1920 च्या अंतर्गत खटला दाखल केला आहे.
 
सीमा आणि सचिन यांनी एकमेकांबरोबर राहण्यासाठी फक्त सीमाच ओलांडल्या नाहीत तर अनेक संरक्षण यंत्रणांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले. सचिन आणि सीमा दोघंही अटकेत आहेत. तरीही त्यांनी आशा सोडलेली नाही. कारण दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी सरकारकडे लग्न लावून देण्याची मागणी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती