आदिवासी युवकावर लघवी केल्याचा व्हीडिओ व्हायरल ;संबंधित व्यक्तीला अटक
बुधवार, 5 जुलै 2023 (19:57 IST)
मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात प्रवेश शुक्ला या व्यक्तीने आदिवासी युवकावर लघवी केल्याची घटना घडली आहे.
या अत्यंत घृणास्पद कृत्यानंतर प्रवेश शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे.
पाच ते सहा दिवसांपूर्वीचा हा व्हीडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून समाजाच्या सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
ही घटना कुबरी गावात घडली आहे. हे कृत्य करताना आरोपी नशेत असल्याचं व्हीडिओत दिसत आहे.
आज तक ने दिलेल्या बातमीनुसार प्रवेश शुक्ला हे भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र केदारनाथ शुक्ला यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.
ते म्हणाले, “या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मला फोन करून माहिती घेतली. प्रवेश माझा माणूस आहे का असं त्यांनी विचारलं. त्यावर मी नकारार्थी उत्तर दिलं आहे.” तो त्यांच्या मतदारसंघात राहतो म्हणून ते प्रवेशला ओळखतात आणि तो कार्यक्रमांना यायचा इतकीच ओळख असल्याचं ते म्हणाले.
आरोपी प्रवेश शुक्ला यांना अटक केल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक अंजूलता पटले यांनी दिली आहे. आरोपीविरुद्ध भांदविच्या कलम 294, 504 अंतर्गात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रीवा विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक मिथिलेश शुक्ला यांनी या प्रकरणी पोलीस गांभीर्याने चौकशी करत असल्याचं सांगितलं.
पीडित व्यक्ती दशमत रावत मजूरीचं काम करतो. ते सध्या अतिशय घाबरलेले आहेत. त्यांना आरोपीविरुद्ध कोणतीही केस करायची नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
याप्रकरणी अत्यंत कठोर कारवाई करण्याचे आदेश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार चौहान म्हणाले, “आरोपीला अत्यंत कठोर शिक्षा देण्याचे आदेश मी दिले आहेत. प्रत्येकाला यातून धडा मिळायला हवा. आम्ही त्याला सोडणार नाही. आरोपीला कोणताही जात, धर्म, नसतो, पक्षाचं बंधन नसतं, आरोपी हा आरोपी असतो.”
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही या घटनेचा निषेध केला असून ही घटना अत्यंत अमानवीय आणि निंदनीय असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर आणि सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
विरोधी पक्ष आक्रमक
लघवी करणारी व्यक्ती भाजप नेता असल्याचं सांगितलं जात आहे. हा मुद्दा काँग्रेसने उचलून धरला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की लघवी करणारी व्यक्ती भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहे. तसं ट्विट त्यांनी केली आहे.
मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अब्बास हफीज यांनी आरोपी प्रवेश शुक्ला यांचे भाजप नेत्यांबरोबरचे फोटो ट्विट केले आहेत.
ते लिहितात, “आदिवासींच्या हिताच्या खोट्या खोट्या गोष्टी सांगणाऱ्या भाजपचा नेता एका गरीब आदिवासी व्यक्तीवर अशा पद्धतीने लघवी करत आहे. अति निंदनीय कृत्य.”
आणखी एका ट्विटमध्ये ते लिहितात, “आदरणीय शिवराज व्हीडिओच्या बाबीत सीधी गावातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण तीन महिन्याच्या आधीचं आहे. मात्र काँग्रेसने विरोधी स्वर आळवल्यावर आता कारवाई होत आहे. आजपर्यंत तुमचं प्रशासन काय झोपलं होतं का?”
काँग्रेस प्रवक्ते हाफीज यांनी भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांना निष्कासित करण्याची मागणी केली आहे.
भाजपने प्रवेश शुक्ला त्यांच्या पक्षात असल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. मध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते आशीष अग्रवाल म्हणाले की आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशीच भाजपची मागणी आहे.
त्याचवेळी समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मोर्य यांनी ट्विटरवर लिहिलं, “आदिवासी समाजातील व्यक्तीवर भाजपच्या नेत्याचा प्रतिनिधी प्रवेश शुक्ला लघवी करताना दिसत आहे. हेच हिंदू राष्ट्राचं सत्य आहे का?”
भाजप प्रवक्ता नरेंद्र सलुजा म्हणाले की आमदार केदारनाख शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे की आरोपीशी त्यांचा काहीही संबंध नाही तर काँग्रेस अशा लाजिरवाण्या घटनेवर राजकारण का करत आहे?
पीडित व्यक्तीचं कथित प्रतिज्ञापत्र व्हायरल
सोशल मीडियावर आता पीडित व्यक्तीचं कथित प्रतिज्ञापत्र व्हायरल होत आहे. त्यात प्रवेश शुक्ला यांनी असं कोणतंही कृत्य न केल्याचं लिहिलं आहे.
मध्य प्रदेशातल्या फ्री प्रेस या वर्तमानपत्रात आलेल्या बातमीनुसार पीडित व्यक्तीवर एक प्रतिज्ञापत्र तयार केलं, त्यात व्हायरल व्हीडिओ फेक असल्याचं म्हटलं आहे.
या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की काही लोक पीडितांवर प्रवेश शुक्लाच्या विरोधात तक्रार करण्याचा दबाव टाकत होते.