NEET : प्रवेशासंबंधी प्रक्रिया थांबवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, या परीक्षेच्या निकालाचा नेमका वाद काय आहे?

मंगळवार, 11 जून 2024 (12:15 IST)
सुप्रीम कोर्टाने यावर्षी झालेली NEET परीक्षा रद्द करण्यात यावी आणि पुनर्परीक्षा घेण्यात यावी, यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची सुनावणी 8 जुलैला करण्यात येईल, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. दरम्यान, अॅडव्होकेट मॅथ्यूज जे यांनी प्रवेशासंबंधीची प्रक्रिया थांबवावी, असे निर्देश देण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावली.
 
वैद्यकीय शिक्षणासाठीच्या NEET परीक्षेचा निकाल 4 जूनला लागला. विविध कारणांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेत, परीक्षेचं आयोजन योग्य प्रकारे करण्यात आलं नसल्याचं म्हणत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली होती. महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी केली होती.
 
NEET परीक्षा काय आहे?
NEET म्हणजे National Eligibility cum Entrance Test. वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. एकूण 720 मार्कांच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पर्याय निवडून आपलं उत्तर द्यायचं असतं. यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना 4 मार्क मिळतात तर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 मार्क कापला जातो.
 
NEET च्या निकालांवरचे आक्षेप काय आहेत?
नीट परीक्षेचा निकाल 14 जूनला लागेल असं जाहीर करण्यात आलं होतं. पण 4 जूनला देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच अचानक NEET परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला. 5 मे रोजी यावर्षीची नीट परीक्षा झाली. या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23.33 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. 14 रोजी परीक्षेचा निकाल लागणार असं जाहीर करण्यात आलं होतं. पण याच्या दहा दिवस आधीच, 4 जूनला निकाल जाहीर करण्यात आला. नीट परीक्षेच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असणाऱ्यांच्या मते परीक्षेमध्ये गडबड झाल्याचा संशय यायला यावरून सुरुवात झाली. या NEET परीक्षेची तयारी करून घेणारे कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांनी या निकालांबद्दलचे काही गंभीर आक्षेप मांडले आहेत. रीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले आहे. 2023मध्ये देशभरातून फक्त दोन मुलांना असे शंभर टक्के मार्क मिळाले होते. 2022 मध्ये पैकीच्या पैकी गुण कोणालाही मिळाले नाहीत. या परीक्षेतल्या चार टॉपर्सना 720 पैकी 715 मार्क मिळाले होते. यावेळच्या निकालांमधली आणखी एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्या एकाच सेंटरमधून परीक्षा दिली होती. तज्ज्ञांच्या मते असं होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. या टॉपर्सच्या खालोखाल स्कोअर असलेल्या मुलांना 718 आणि 719 मार्क मिळाले आहेत. या परीक्षेची मार्क देण्याची पद्धत पाहिली तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या विद्यार्थ्यांना हे मार्क मिळू शकत नाहीत. जरी एखाद्या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याचं एक जरी उत्तर चुकलं तरी त्याला 715 मार्क मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना वेळवर प्रश्नपत्रिका मिळाली नाही त्यांना त्यांचा वेळ फुकट गेल्याबद्दल काही मार्क देण्यात आल्याने असा स्कोअर मिळाल्याचं स्पष्टीकरण NEET चं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलंय. परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही वा प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचं म्हणत NTAने आरोप फेटाळले आहेत. पण या निकालांनंतर अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी निदर्शनं करत परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी केलीय. सुप्रीम कोर्टासह देशभरातल्या कोर्टांत याविषयीच्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे आरोपही होत असून याबद्दल बिहारमध्ये एक तक्रार दाखल करण्यात आली असून 13 जणांना अटक करण्यात आलीय. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. तर सुप्रीम कोर्टातही या निकालांवर आणि काही विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कांवर आक्षेप घेणारी याचिका दाखल करण्यात आलीय. तर दुसरीकडे नीट परीक्षेत ज्या प्रमाणात मुलांना चांगले मार्क मिळाले आहेत, त्यामुळे क्वालिफायिंग स्कोअरमध्येही वाढ झालीय. गेली तीन वर्षं NEET परीक्षेचा क्वालिफायिंग स्कोअर होता. यावर्षी तो वाढून 164 झालाय.
 
NTAने काय म्हटलंय?
परीक्षेचं आयोजन करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 6 जून रोजी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळले. लवकरात लवकर निकाल जाहीर करणं हा प्रक्रियेचाच भाग असून यावेळी हे काम 30 दिवसांच्या आत करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी कमी वेळ मिळाल्याने यावेळी 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्याचं NTAने म्हटलंय. आपल्याला वेळेत पेपर सोडवायला सुरुवात करता आली नसल्याचं काही विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल करत म्हटलं होतं. परीक्षा केंद्राचं CCTV फुटेज पाहून आणि अधिकाऱ्यांशी बोलून या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्यात आल्याचं NTA ने म्हटलंय. सुप्रीम कोर्टाने कॉमन लॉ अॅडमिशन टेस्टसाठी सुचवलेल्या सूत्रानुसारच हे गुण देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. यामुळेच काही विद्यार्थ्यांना 718 मार्क मिळाले आहेत. यासोबतच 720 म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 6 जणांना ग्रेस मार्क मिळाले असल्याचंही एजन्सीने म्हटलंय. याशिवाय शंभर टक्के मार्क मिळवणाऱ्या 44 इतर विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्रातील एका प्रश्नाच्या उत्तरासाठी रिव्हिजन मार्क्स देण्यात आलेले आहेत. परीक्षेचा पेपर फुटला नसून परीक्षा आयोजित करताना त्याबाबतच्या नियमांमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आली नसल्याचं NTA ने म्हटलंय. परीक्षेसंदर्भात इतर तक्रारींविषयीही कारवाई करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
विद्यार्थी आणि इतरांचं म्हणणं काय आहे?
सोशल मीडियावर विद्यार्थी आणि कोचिंग सेंटर्सनी अनेक तक्रारी मांडल्या आहेत. शिक्षणक्षेत्राशी संबंधित वेबसाईट 'करियर्स 360'चे संस्थापक महेश्वर पेरी यांनी बीबीसीला सांगितलं, "या संपूर्ण प्रकरणांत काही गंभीर बाबी आहेत. भारतात अनेक प्रवेश परीक्षा होतात. सहसा काही विद्यार्थी असे असतात ज्यांना अतिशय चांगले गुण मिळतात. पण ही घटना विलक्षण आहे जिथे एक-दोन नाही तर 67 जणांबद्दल आपण बोलतोय." विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कच्या पद्धतीही पारदर्शक नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, "यापूर्वी एखाद्या प्रश्नासाठी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अधिकचे वा ग्रेस मार्क दिले जात आहेत का, हे NTA किंवा परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था या Answer Keys म्हणजे प्रश्नपत्रिकेतल्या प्रश्नांची उत्तरं जाहीर करतानाच स्पष्ट करत. पण या प्रकरणी मात्र त्यांच्याकडे विचारणा करण्यात आल्यानंतर स्पष्टीकरण देण्यात आलं."
 
वाढलेला कट-ऑफ
आपण स्वतः एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका तपासली असून या विद्यार्थ्याला NTAने 85 अतिरिक्त गुण दिल्याचं 'फिजिक्सवाला' या कोचिंग इन्स्टिट्यूचे संस्थापक अलख पांडे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर म्हटलंय. अलख पांडे यांचा हा दावा बीबीसीने स्वतंत्रपणे पडताळलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाल्याने कट-ऑफची पातळी वाढली आहे. 'मोशन एज्युकेशन' नावाची संस्था चालवणाऱ्या नितीन विजय यांनी एक्सवर लिहीलंय, "यावेळी एकसारखाच कट-ऑफ असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तिप्पट झालीय. हे अशक्य आहे. यावेळचा पेपर गेल्या वर्षीच्या तुलनेत सोपा तर नव्हता. चीटिंग झालीय. आपण आवाज उठवायला हवा." या वादाचा विद्यार्थ्यांवरही परिणाम झालाय. दिल्लीच्या अद्विकानेही यावर्षी NEETची परीक्षा दिली होती. अद्विका सांगते, "या परीक्षेवरचा सगळ्यांचा विश्वास उडालाय. मला 600 गुण मिळाले आहेत. मला वाटलं होतं माझं रँकिंग 30 हजारच्या आसपास असेल. पण मला 80 हजारचा रँक मिळालाय. आणि हा कट-ऑफपासून बराच खाली आहे." इतर एखाद्या वर्षी आपल्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असता पण यावर्षी ते कठीण दिसत असल्याचं अद्विका सांगते. पेपर वेळेवर सुरू न झाल्याबद्दल देण्यात आलेल्या ग्रेस मार्कांबद्दलही आक्षेप घेतले जातायत. महेश्वर पेरी म्हणतात, "तुम्ही पेपर एक तास उशिरा सुरू झाल्याबद्दल मला 100 गुण देता कारण हाच पेपर जर मला नेमलेल्या वेळेत मिळाला असता तर मी इतके गुण मिळवू शकलो असतो. पण इतर वेळेत मी यापैकी अनेक प्रश्नांची उत्तरं चूक देण्याची शक्यता आहेच."
 
परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी
ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी केलीय. अद्विका म्हणते, "ही परीक्षा पुन्हा घेतली जावी असं मला वाटतं. जेव्हा सर्वाधिक गुण मिळवणारे आठ विद्यार्थी एकाच सेंटरचे असतात तेव्हा काहीतरी घोटाळा असल्यासारखं वाटणं साहजिक आहे." परीक्षा पुन्हा घेण्यात यावी या मागणीसाठी दोन याचिकाही सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. कोर्टाने 17 मे रोजी अशाच एका याचिकेअंतर्गत नोटीस काढली होती पण याविषयीची सुनावणी उन्हाळी सुटीनंतर करण्यात येईल असं सांगितलं होतं. पेपर फुटीची तपासणी करण्यासाठी एका विशेष तपास दलाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. राजकीय पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरलाय. या NEET परीक्षेतल्या अनियमिततांचा तपास करण्यात यावा अशी मागणी काँग्रेसने सात जूनला एका पत्रकार परिषदेद्वारे केली होती.
 
Published By- Dhanashri Naik 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती