नरेंद्र मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट, रविवारी घेणार पंतप्रधान पदाची शपथ

शुक्रवार, 7 जून 2024 (20:21 IST)
एनडीएचे नेते नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. खासदारांच्या पाठिंब्याचे पत्रही नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींना सुपूर्द केले. 
 
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदी यांना नवीन सरकार स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. शुक्रवारी सकाळी एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर संध्याकाळी ते राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यास गेले होते.यानंतर राष्ट्रपतींनी NDA संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. 9 जून रोजी नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
 
भेटीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले, "आज सकाळी एनडीएची बैठक झाली होती. एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी मला पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी राष्ट्रपतींना या गोष्टीची माहिती दिली."
 
ते म्हणाले, "राष्ट्रपतींनी मला बोलावलं होतं आणि मला नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांनी मला शपथविधी समारंभासाठी आणि मंत्रिमंडळातील सदस्यांच्या यादीबद्दल सूचना केली आहे. ढोबळपणे राष्ट्रपतींना सांगितलं आहे की 9 तारखेला संध्याकाळी समारंभ करता येईल."
 
मोदी म्हणाले, "उर्वरित बाबींवर राष्ट्रपती भवन काम करणार आहे. तोपर्यत आम्ही मंत्रिमंडळाची यादी राष्ट्रपतींना सादर करू आणि त्यानंतर शपथविधी समारंभ होईल."
 
राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणाले की, देशवासियांनी एनडीए सरकारला तिसऱ्यांदा देशसेवा करण्याचा आदेश दिला आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा देशवासीयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. गेल्या दोन टर्ममध्ये देशाने ज्या गतीने प्रगती केली त्यापेक्षा अधिक वेगाने विकास कामे केली जातील, अशी ग्वाही मी देशवासियांना देतो. देशाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आमचे सरकार काम करेल, असे ते म्हणाले. देशाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यात कुठलीही कमतरता ठेवली जाणार नाही, असे ते म्हणाले.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती