MV केम प्लुटो : इराणच्या ड्रोनचा भारताजवळ टँकरवर हल्ला, अमेरिकेचा दावा

रविवार, 24 डिसेंबर 2023 (17:24 IST)
इराणने डागलेल्या ड्रोनने अरबी समुद्रात जहाजाला धडक दिली. या जहाजात रसायनाने भरलेले टँकर होते, असा अमेरिकन लष्करानं दावा केलाय.
अमेरिकेचं लष्करी मुख्यालय असलेल्या पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, एमव्ही केम प्लुटो या ट्रकला भारतीय समुद्रकिनाऱ्यापासून 370 किमी अंतरावर धडक दिली आहे. ही घटना शनिवार (23 डिसेंबर) ला घडली आहे.
 
जहाजाला लागलेली आग विझवण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
या घटनेवर अद्याप इराणने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
लाल समुद्रात गेल्या काही काळात बरेच ड्रोन आणि रॉकेट हल्ले झाले आहे. हे हल्ले येमेनमधील हुती बंडखोरांनी केले असून त्यांना इराणचा पाठिंबा आहे.
 
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अमेरिकन सेंट्रल कमांडने शनिवारी सांगितलं, “तांबड्या समुद्रात येमेनमधील हुतीच्या ताब्यात असलेल्या भागातून दोन जहाजविरोधी क्षेपणास्त्र डागले गेले आहेत. मात्र यामुळे जहाजांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.”
 
तसंच, USS Laboon ही युद्धनौका या भागात गस्त घालत आहे. या नौकेने हुतीकडून येणारे चार हवाई ड्रोन उद्ध्वस्त केले आहेत.
 
त्याच दिवशी तांबड्या समुद्रात तेलाच्या एका टँकरवर हुती ड्रोनने हल्ला केला. तर एक दुसरा टँकर थोडक्यात बचावला.
 
हुती बंडखोरांनी बहुतांश येमेनवर ताबा मिळवला आहे. हेच बंडखोर इस्रायलशी निगडीत टँकरवर हल्ला करत असल्याचा दावा करत आहे. इस्रायल गाझा युद्ध हे त्यांचं महत्त्वाचं कारण आहे.
 
तांबड्या समुद्रातील हल्ल्याच्या भीतीने अनेक मोठ्या कंपन्यांनी लाल समुद्रात त्यांची कामं थांबवली आहे.
 
पेंटागॉनने दिलेल्या माहितीनुसार, एमव्ही केम प्लुटोवर एका ड्रोनने हल्ला केला आहे.
 
हा टँकर जपानच्या मालकीचा, नेदरलँडकडून चालवला जाणारा होता. त्यावर लायबेरियाचा झेंडा होता.
 
याआधी सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी अंब्रेच्या मते हा टँकर इस्रायलशी संबंधित होता आणि तो सौदी अरेबियातून भारतात जात होता.
 
ही घटना गुजरातच्या वेरावल शहराजवळ घडली आहे अशी माहिती युनायटेड किंग्डम मरीटाईम ट्रेड ऑर्गनायझेशनने दिली आहे.
 
या हल्ल्यामुळे टँकरचं नुकसान झालं असून त्यातून पाणी गळायला सुरुवात झाली आहे.
 
तांबड्या समुद्रात टँकरविरोधात अशा कारवाया करण्यात इराणचा मोठा वाटा असल्याचा आरोप अमेरिकेने शनिवारी केला होता.
 
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागाचे प्रवक्ते अँड्रेनिन वॅटसन म्हणाले की, हुती बंडखोरांना पाठिंबा देण्याच्या इराणच्या धोरणाचंच हे द्योतक आहे.
 
त्यानंतर इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डच्या कमांडरने इशारा दिला की, अमेरिकेने गाझामध्ये होत असलेल्या कारवायांना पाठिंबा देणं थांबवलं नाही तर तांबड्या समुद्रातील सागरी मार्ग ते बंद करतील.
 
ब्रिगेडिअर जन. मोहम्मद रझा नगदी म्हणाले की त्यात जिब्राल्टर खाडीचा आणि भूमध्य समुद्राचाही समावेश असेल. मात्र, हे कसं होईल याची अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.
 
ड्रोन हल्ला झालेलं जहाज मुंबईच्या दिशेनं
भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ ड्रोन हल्ला झालेलं जहाज आता मुंबईकडे मार्गक्रमण करत आहे.
 
एम व्ही केम प्लुटो असं या जहाजाचं नाव असून हे एक केमिकल टँकर म्हणजे रसायनांची वाहतूक करणारं जहाज होतं. ड्रोन हल्ल्यानंतर या टँकरवर आग लागली होती, ती विझवण्यात आली.
 
हा हल्ला इराणमधून झाला असल्याचं अमेरिकन संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे तर इराणनं त्यावर अजून कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं दिलेल्या माहितीनुसार या 20 भारतीय आणि एक व्हिएतनामी कर्मचारी होते, ते सर्वजण सुखरूप आहेत. या हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलाने मदतीसाठी एक जहाज आणि हेलिकॉप्टर पाठवलं. हे हेलिकॉप्टर जहाजावर गेलं आणि त्यातले सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यात आली, अशी माहिती भारतीय नौदलानं दिली.
 
Published By- Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती