शिंक अडवून धरणं किती धोकादायक, जाणून घ्या

सोमवार, 18 डिसेंबर 2023 (09:49 IST)
शिंक रोखण्याचा प्रयत्न करत असताना एका व्यक्तीच्या घश्यामध्ये जखम झाल्यानंतर डॉक्टरांनी शिंक रोखून धरण्याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.
ब्रिटनच्या डंडीमध्ये एका 30 वर्षीय व्यक्तीला घश्यामध्ये प्रचंड दुखू लागल्यानंतर नाईनवेल्स हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांनी शिंक रोखण्यासाठी आपलं नाक आणि तोंड बंद करून घेतलं होतं.
 
स्कॅन केल्यानंतर कळलं की शिंक रोखल्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेत 2 मिलीमीटर खोल जखम झाली आहे.
 
डंडी विद्यापीठाच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, शिंक येताना जर व्यक्तीने आपलं तोंड आणि नाक बंद केलं तर श्वासनलिकेच्या वरच्या भागावरील दाब 20 टक्क्यांनी वाढू शकतो.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, यामुळे व्यक्तीच्या कानाचे पडदेदेखील फाटू शकतात. रक्तवाहिनीमध्ये अनपेक्षित फुगवटा येऊ शकतो, ज्याला ‘एन्युरिझम’ म्हणतात. छातीची हाडं मोडू शकतात किंवा इतर काहीतरी गंभीर इजा होऊ शकते.
 
वैद्यकीय विज्ञानाशी संबंधित बीएमजे जर्नल्समध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
 
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जेव्हा त्यांनी व्यक्तीची तपासणी केली तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की गळ्याला स्पर्श केल्यानंतर त्यातून काही कडकडण्यासारखे आवाज येत होते आणि त्या व्यक्तीचं त्यावर नियंत्रण नव्हतं.
 
जेव्हा शिंक आली तेव्हा ती व्यक्ती (व्यक्तीचं नाव गुप्त ठेवण्यात आलंय) कार चालवत होती आणि त्यांनी सीटबेल्ट लावला होता. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांना आधीपासूनच एलर्जी आणि घसादुखीचा त्रास होता.
 
'शिंक येण्याने शरीराचं रक्षण होतं'
 
डॉक्टरांच म्हणणं आहे की, त्या व्यक्तीला शस्त्रक्रियेची नव्हती आणि त्यांना काही काळ रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेलं.
 
दुखणं कमी करण्याची औषधं दिल्यानंतर त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
 
डॉक्टरांनी त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा आणि दोन आठवडे कोणतीही जड वस्तू न उचलण्याचा सल्ला दिला.
 
पाच आठवड्यांनंतर पुन्हा केलेल्या स्कॅनमध्ये जेव्हा त्या व्यक्तीच्या घशातील जखम बरी झाल्याचं दिसून आलं तेव्हा डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
 
बीएमजेमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालाचे लेखक डॉ. रासदेस मिसिरोव्स यांनी बीबीसीला सांगितलं की, शिंक ही मानवी शरीराची एक ‘बचाव यंत्रणा', म्हणजेच एक नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे.
 
शरीरात गेलेले त्रासदायक घटक शरीर नाकाद्वारे शरीराबाहेर टाकतं, म्हणून शिंक कधीही रोखता कामा नये, असं त्यांनी स्पष्ट केलं.
 
ते म्हणतात की, "शिंकताना विषाणूंसारखे त्रासदायक घटकही थुंकी आणि शेंबडाच्या माध्यमातून नाका-तोंडाद्वारे बाहेर पडतात. आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी आपल्या हातांनी किंवा कोपराच्या आतील भागाने नाक झाकलं पाहिजे."
डॉक्टर रासदेस मिसिरोव्स म्हणाले की, कधी-कधी लोकं त्यांची शिंक थांबवण्यासाठी नाक किंवा तोंडसुद्धा बंद करत नाहीत आणि दुसऱ्या पद्धतीने शिंक रोखण्याचा प्रयत्न करतात.
 
ते सांगतात, “वैयक्तिकरित्या शिंक रोखण्यासाठी मी माझं नाक बंद करत नाही. मी एक दुसरी पद्धत वापरतो. मी हाताचा अंगठा नाकाच्या खाली वरच्या ओठांच्या वर ठेवून काही सेकंदासाठी त्या जागेवर दाब देतो. माझ्यासाठी ही पद्धत कामी येते.”
 
त्यामुळे असं होतं की नाक उघडं ठेवल्यामुळे श्वास गुदमरल्यासारखी परिस्थिती उद्भवली तर शिंक नाकातून बाहेर येऊ शकते.
 
शिंक थांबवल्याने अचानक श्वासनलिकेला गंभीर इजा होऊ शकते, ज्याला वैद्यकीय भाषेत "स्पॉन्टेनियस ट्रेकियल परफोरेशन" म्हटलं जातं. डॉक्टरांचं म्हणणं आहे की अशी काही मोजकीच प्रकरणं असतात, परंतु कधीकधी ते प्राणघातकही ठरू शकतं.
 
2018 साली ब्रिटनमध्ये असा प्रकार उघडकीस आलेला जेव्हा लीसेस्टरमधील एका व्यक्तीला शिंक आल्याने त्याच्या घशाला दुखापत झालेली.
 
त्यांचं असं म्हणणं होतं की, शिंक थांबवल्यानंतर त्यांना घशात अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि बोलायला आणि गिळायला त्रास होऊ लागला.
 
घसा बरा होण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी डॉक्टरांनी त्यांच्या शरीराला सात दिवस नळीवाटे अन्नपदार्थांचा पुरवठा केला.
 
शिंक का येते?
 
संशोधन करणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, शिंक फक्त जंतू, विषाणू किंवा परागकणांमुळे येत नाही. कधीकधी सूर्याची तीव्र किरणं आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळेही एखाद्या व्यक्तीला शिंका यायला सुरूवात होऊ शकते.
 
1000 हून अधिक लोकांवर केलेल्या संशोधनानंतर जर्मन संशोधकांनी सांगितलं की, सूर्याची तीव्र किरणं किंवा तीव्र सूर्यप्रकाशामुळे शिंक येत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
 
काही तज्ज्ञांच्या मते याचं कारण अनुवांशिकही असू शकतं. काही लोकं म्हणतात की भरपूर जेवल्यानंतरही त्यांना शिंक येते.
 
एखाद्या व्यक्तीची शिंक आठ मीटर म्हणजेच 26 फूटांपर्यंत पोहोचू शकते.
 
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये लिडिया बोरोइबा यांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलंय की, शिंकताना नाकातून जे कण बाहेर पडतात ते काही मिनिटं हवेत तरंगत राहू शकतात.
 
Published By- Priya Dixit
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती