वय वाढल्यानंतर IVFद्वारे बाळ जन्माला घालणं किती कठीण असतं?

बुधवार, 6 डिसेंबर 2023 (19:15 IST)
"हा चमत्कार आहे."
हे शब्द आहेत, युगांडाची राजधानी कंपालामधील 70 वर्षे वय असलेल्या सफिना नामुकवाया यांचे. सफिना यांनी 29 नोव्हेंबरला IVF तंत्राच्या मदतीनं बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्यांच्या तोंडातून निघालेलं हे पहिलं वाक्य.
 
सफिना आफ्रिकेच्या युगांडामधील बाळाला जन्म देणाऱ्या सर्वात वयस्क महिला आहेत.
 
त्यांनी वुमन्स हॉस्पिटल इंटरनॅशनल अँड फर्टिलिटी सेंटर मध्ये सिझेरियन ऑपरेशनद्वारे एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला.
 
सफिना यांनी एका डोनर एग आणि पतीच्या स्पर्मच्या मदतीनं या मुलांना जन्म दिला, असं डब्ल्यूएचआयअँडएफसीमधील फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. अॅडवर्ड तामले साली यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
 
सफिना नामुकवाया यांनी तीन वर्षांपूर्वी 2020 मध्येही अशा प्रकारे एका मुलीला जन्म दिला होता. त्यांनी एवढ्या जास्त वयामध्ये मुलांना जन्म देण्यामागं एकच कारण आहे, ते म्हणजे बाळ होत नसल्यामुळं मिळणाऱ्या टोमण्यांना त्या कंटाळल्या होत्या.
 
सफिना यांच्या प्रमाणेच बनासकांठा (गुजरात) मधील राहणाऱ्या गीता बेन (नाव बदललेले आहे) यांनाही मूलबाळ नसल्यानं त्यांना समाजानं खूप टोमणे मारले.
 
अखेर त्यांनी IVF ची मदत घेतली आणि त्या 2016 मध्ये आई झाल्या.
 
बाळ न होण्याचं दुःख कमी करणारे तंत्रज्ञान
गीता बेन यांनी बीबीसीचे सहकारी आर. द्विवेदी यांच्याशी बोलताना सांगितलं की, त्या 25 वर्षांनंतर आई बनू शकल्या. त्यावेळी त्यांचं वय जवळपास 42 वर्षे होतं.
 
आता त्या आणि त्यांचे पती मनोज कुमार (नाव बदललेले) त्यांच्या सात वर्षांच्या मुलाबरोबर खूप आनंदी आहेत.
 
मनोज कुमार म्हणाले की, लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही मूल होत नसल्यानं लोक त्यांना सारखं बोलायचे. त्याला कंटाळून त्यांनी ओळखीच्या लोकांबरोबरच नातेवाईकांशी बोलणंही सोडलं. तसंच त्यानी लग्न, समारंभ आणि कार्यक्रमांत जाणंही बंद केलं.
 
IVF म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायजेशन तंत्रज्ञान नेमकं काय असतं?
 
याबाबत माहिती देताना डॉ.नयना पटेल यांनी बीबीसीचे सहकारी आर.द्विवेदी यांनी सांगितलं की, याची सुरुवात 1978 मध्ये झाली होती. तेव्हा लेस्ली ब्राऊन टेस्ट ट्यूब बेबीला जन्म देणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या होत्या.
 
डॉक्टर पटेल गुजरातच्या आणंदमधील आकांक्षा हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मेडिकल डायरेक्टर आहेत. त्या म्हणाल्या की, " ज्यांची ट्यूब इन्फेक्शन किंवा इतर काही कारणाने खराब झालेली असेल, अशा महिलांमध्ये IVF चा वापर केला जातो.
 
"यात आम्ही स्त्रीबीज आणि स्पर्म (शुक्राणू) लॅबमध्ये यांचा संयोग केला जातो. जेव्हा भ्रूण तयार होतं, तेव्हा ते महिलेच्या गर्भाशयात सोडलं जातं. या तंत्रानं अनेक जोडप्यांना आई वडील होण्याचं सुख दिलं आहे. तसं महिलांच्या कपाळावरून आई बनू न शकण्याचा कलंक यामुळं पुसला आहे," असंही त्या म्हणाल्या.
 
1991 मध्ये आलेलं इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन (आयसीएसआय) तंत्राला त्या या क्रांतीतील दुसरा टप्पा मानतात.
 
त्यांच्या मते, "पुरुषांमध्ये स्पर्मचं प्रमाण कमी किंवा त्याचा दर्जा चांगला नसल्याने मूल होण्यात अडचणी येत असलेल्या दाम्पत्यांना आयसीएसआयमुळं फायदा झाला. यामुळं स्पर्म डोनरची गरजही जवळपास राहिलेला नाही. त्यामुळंच लोक न कचरता याचा अवलंब करत आहेत.
 
हे एवढं सोपं असं का?
पण सगळं काही एवढं सोपंही नसतं.
 
IVF चा वापर गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढला आहे. पण प्रत्येकवेळी या प्रक्रियेमुळं आई-वडील होताच येतं असंही नाही. अनेकदा काही प्रकरणं अपयशीही ठरतात.
 
"अनेकदा दाम्पत्यांना पहिल्या प्रयत्नातच आनंद मिळतो. तर अनेकदा ही प्रक्रिया खूप काळ चालते," असंही डॉ. पटेल म्हणाल्या
गीता बेन म्हणाल्या की, त्यांनी IVF च्या पूर्वीही खूप उपचार घेतले होते. त्यानंतर त्यांनी IVF ची मदत घेतली. त्यातही त्यांना दोन वर्षांनंतर यश मिळालं.
 
आठ वेळा (आठ सायकलनंतर) अपयश आल्यानंतर नवव्या वेळी त्या गर्भवती राहिल्या. पण काही महिन्यांनी गर्भपात झाला. त्यानंतर दहाव्या वेळी त्या बाळाला जन्म देऊ शकल्या.
 
गीता बेन एवढ्या संयमानं हे उपचार घेऊ शकल्या त्यामागं प्रत्येक पावलावर त्यांना पती मनोज कुमार यांची मिळालेली साथ हे कारण होतं. अनेक प्रकरणांमध्ये अशा प्रकारे आई बनण्याची इच्छा असलेल्या महिलांना कुटुंबाचा पाठिंबा मिळत नाही.
 
यश मिळण्याची खात्री असते का?
याबाबत डॉ. नयना पटेल म्हणाल्या की, 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांच्या प्रकरणांत तर 80 टक्के यश मिळतं. महिलांचं वय 35 ते 40 दरम्यान असेल तर मुलं होण्याची शक्यता 60 टक्क्यांपर्यंत असते. तर 40 च्या वर वय असल्यास 18 ते 20 टक्के प्रकरणांमध्येच यश मिळतं.
 
भावनात्मक चढ-उतार हे मोठे आव्हान
या प्रक्रियेसाठी येणारी दाम्पत्यं अनेकदा भावनिक दृष्ट्या खूप खचलेले असतात, असं दिल्लीच्या ब्लूम IVF सेंटर मधील स्पेशालिस्ट डॉ. सुनिता अरोरा यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
 
मूल होत नसेल तर लोक कशा प्रकारचा दबाव सहन करत असतात, याचा अंदाज यावरून लावता येईल की, मनोज कुमार यांनी एकदा तर विष घेऊन आत्महत्या करण्याचा विचार केला होता.
 
डॉ. अरोरा म्हणाल्या की, "ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक नाही, अशीच भावना पूर्णपणे त्यांच्या मनात असते. पण हे उपचार घेताचा रुग्णानं सकारात्मक भावना ठेवावी याचीच सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं असतं."
 
त्या म्हणाल्या की, "मुळातच गर्भावस्थेदरम्यान शारीरिक बदलांमुळं महिलांचं मनोबल उंचावलेलं असणं गरजेचं असतं. त्यामुळं अशा प्रकरणांमध्ये डॉक्टर रुग्णांचं समुपदेशनही करत असतात. भावनिक गरजांचा विचार करून प्रत्येक IVF सेंटरवर समुपदेशन असणं कायद्यानं अनिवार्य ठरवलेलं आहे."
 
भारतात अशी अनेक प्रकरणं चर्चेत राहिली आहेत.
 
पंजाबमध्ये 2016 मध्ये 72 वर्षीय दलजिंदर कौर यांना बाळाला जन्म दिला होता.
 
आंध्र प्रदेशात 2019 मध्ये 74 वर्षीय महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
 
राजस्थानात 2022 मध्ये 75 वर्षीय वृद्ध महिलेला 54 वर्षांनंतर आई बनण्याचं सुख मिळालं होतं.
 
कायदा करून ठरवली वयोमर्यादा
भारतात 2021 मध्ये एक नवीन कायदा असिस्टंट रिप्रोडक्टिव टेक्नॉलॉजी (एआरटी) अधिनियम, 2021 लागू झाला.
 
डॉ. सुनीता अरोरा या कायद्यांतर्गत आयव्हीएफची मदत घेऊन आई बनणाऱ्यांसाठी कमाल वय 50 आणि वडिलांसाठी 55 वर्षे कमाल वय असण्याला पाठिंबा देतात.
 
"कमाल वय ठरवण्याचं एक कारण म्हणजे मुलांच्या पालन पोषणाचा प्रश्न हेही आहे. समजा मूल 15-20 वर्षांचं होईपर्यंत आई-वडिलांचं वय 70 वर्षांपेक्षा अधिक झालं, तर ते त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी कशी पार पाडणार. पण सर्वात मोठं कारण म्हणजे, 50 वर्षानंतर आरोग्याच्या दृष्टीनं आई बनणं हे सोपं नसतं," असं डॉ. अरोरा म्हणाल्या.
 
तसंच "45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या IVF प्रकरणांत आम्ही आरोग्यावर खूप लक्ष देतो. कारण गर्भावस्थेत हृदयावरचा ताण वाढतो, तसंच रक्तदाबही कमी-जास्त होत असतो. अनेकदा महिला अशा प्रकारचा बदल सहन करण्याच्या स्थितीतही नसतात," असंही त्या म्हणाल्या.
 
डॉ. पटेल यांनीही जास्त वयानंतर IVF ची मदत घेण्यास विरोध केला. पण काही प्रकरणांत एक-दोन वर्षांची सूट देण्याचा विचार करायला हवा, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
 
उदाहरणादाखल त्या म्हणाल्या की, "जर पत्नीचं वय 40-45 दरम्यान असेल, पण पती 56 वर्षांचा असेल किंवा पत्नी 51 वर्षांची आणि पती 53 वर्षांचे असतील तर अशा प्रकरणांत आरोग्याच्या आधारावर IVF ची परवानगी देण्याबाबत विचार करायला हरकत नाही."
 
वय वाढल्यानंतर माता-पिता बनण्याची आव्हानं
 
डॉक्टरांच्या मते, अधिक वयातील महिलांचं शरीर बाळ जन्माला घालण्यासाठी पूर्णपणे फिट नसतं.
 
गर्भावस्थेदरम्यान हार्ट प्रेशर आणि बीपी वाढतो. अनेकदा महिला ते सहन करण्याच्या स्थितीत नसतात.
 
वय अधिक असल्यास शारीरिक आणि आर्थिक दृष्टीनं मुलाचं पालन पोषण करण्याची जबाबदारीही मोठं आव्हानं असतं.
 
खर्चदेखील महत्त्वाचा मुद्दा
 
डॉ. सुनीता अरोरा म्हणाल्या की, आयव्हीएफच्या एका सायकलसाठी दीड ते दोन लाखांचा खर्च येतो. महिलांचं वय 21 ते 35 दरम्यान असेल तर, एक-दोन सायकलमध्ये बाळ होण्याची शक्यता अधिक असते.
 
वय जास्त असेल तर अनेकदा प्रयत्न केल्यानंतरच यश येतं. अशा परिस्थितीत जास्त सायकल झाल्यास तेवढा जास्त खर्च करावा लागतो.
 
डॉ. पटेल म्हणाल्या की, आयव्हीएफची मदत घेणाऱ्या महिलांनां आर्थिक आणि त्याबरोबरच मानसिक तसंच शारीरिक आणि सामाजिक पातळीवरही अडचणींचा सामना करावा लागतो. पण एकदा बाळाला कवेत येताच, त्या सर्व वेदना आणि दुःख विसरून जातात.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती