मुकुल रॉय पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये, भाजपाला रामराम

शुक्रवार, 11 जून 2021 (17:10 IST)
पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते मुकुल रॉय ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाच्या (TMC) कार्यालयात पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शुभ्रांशुनेसुद्धा तृणमूलमध्ये प्रवेश केला.
मुकुल रॉय हे एकेकाळी टीएमसीच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत जवळचे मानले जात. मात्र, त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात गेले.
 
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विस्तार करण्यात मुकुल रॉय यांचा मोठा हातभार आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीनंतर मुकुल रॉय भाजपमध्ये नाराज असल्याचे वृत्त समोर येत होतेच.
मुकुल रॉय आणि त्यांची पत्नी कोरोनाबाधित झाले होते आणि या काळात भाजपच्या मंडळींनी त्यांची विचारपूसही केली नव्हती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी मुकुल रॉय यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून मुकुल रॉय यांच्याशी चर्चा केली.
बुधवारी (9 जून) तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सौगत रॉय यांनी मुकुल रॉय यांच्या घरवापसीचे संकेत दिले होते.
सौगत रॉय म्हणाले होते, "मुकुल रॉय तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले असतील, पण त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात काहीच म्हटलं नाहीय."
 
मुकुल रॉय यांनी 2017 साली तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
 
त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तर अनेक नेत्यांनी पक्षांतर करत भाजपला जवळ केलं होतं. विधानसभा निवडणुकीआधी ज्यांनी तृणमूलला राम राम केलं होतं, त्यांना भाजपमध्ये घेण्यात मुकुल रॉय यांची भूमिका महत्त्वाची होती, असं म्हटलं जातं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती