Modi Cabinet Expansion : मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे, नारायण राणेंनी घेतली शपथ
बुधवार, 7 जुलै 2021 (18:28 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आज (7 जुलै) होत आहे. या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सोहळ्यासाठी उपस्थित झाले आहेत.
राष्ट्रभवनात हा सोहळा पार पाडला जात आहे.
महाराष्ट्रातून भाजप खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, डॉ. भागवत कराड यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.
तसंच काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले ज्योतिरादित्य शिंदे, अपना दलच्या अनुप्रिया पटेल, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी देखील मोदींची सकाळी भेट घेतली.
काँग्रेस पक्षाबरोबरची जुनी निष्ठा मोडून ज्योतीरादित्य शिंदे भाजपमध्ये आले. लगेचच मध्य प्रदेशात सरकार पालटलं.
तर आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांनी हिमंत बिस्व सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद रिकामं केलं. हे दोघेही आता मंत्रिमंडळाच्या विस्तारात महत्त्वाची खाती मिळवण्याचे दावेदार आहेत.
याआधी, 12 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद, बाबुल सुप्रियो, प्रताप सारंगी या महत्त्वाच्या नेत्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion. Jyotiraditya Scindia, Pashupati Kumar Paras, Bhupender Yadav, Anupriya Patel, Shobha Karandlaje, Meenakshi Lekhi, Ajay Bhatt, Anurag Thakur to also take the oath. pic.twitter.com/pprtmDu4ko
सध्या महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल हे केंद्रीय मंत्री असून रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर हे मंत्रिमंडळात होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जाते.
नारायण राणे हे आधी शिवसेनेतून काँग्रेस आणि तिथून भाजपमध्ये प्रवास करून आलेत. पण माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांचं राजकीय वजन आहे. ते उद्धव आणि आदित्य ठाकरेंविरोधात जोरदार टीका करत असतात.
खासदार कपिल पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे. ते भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांच्यामुळे आगरी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळू शकेल. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
मंत्रिमंडळ विस्तार आताच कशासाठी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार आहे. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहेत आणि घटनेनुसार 81 मंत्रिपदं दिली जाऊ शकतात.
आताच्या मंत्रिमंडळात फक्त 21 कॅबिनेट दर्जाचे मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आहेत. बाकी 29 राज्यमंत्री आहेत. त्यामुळे निर्मला सीतारमण, पीयूष गोयल आणि हरदीप पुरी यांच्यासारखे सीनियर मंत्री एकापेक्षा जास्त खाती सांभाळत आहेत.
केंद्रीयमंत्री थावरचंद गहलोत यांना कर्नाटकचे राज्यपाल बनवल्याने मंत्रिमंडळात आणखी जागा रिक्त झाली. ते राज्यसभेचे सदस्य होते.
तसंच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर आणि अकाली दल एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर अनेक मंत्रिपदं रिक्त आहेत. काही मंत्री दोन खात्यांचा कार्यभार सांभाळत आहेत. यामुळे आताच्या मंत्र्यांचा भार कमी होण्यास मदत होणार आहेत.
पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, मणिपूर आणि पुढे गुजरातमधल्या विधानसभा निवडणुकाही जवळ आहेत. त्यामुळे या राज्यातल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं.
उत्तर प्रदेश हे तर भाजपसाठी महत्त्वाचं राज्य आहे. तिथल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये नुकताच पार्टीने विजय मिळवलाय.
हा फक्त मंत्रिमंडळ विस्तारच नाही तर काही खात्यांमध्ये खांदेपालटही होऊ शकतो.