खोटे बोलणे, बढाया मारणे, विरोधकांना धमकावणे हे मोदी सरकारचे तत्वज्ञान आहे, त्यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे, अशा शब्दांत यूपीएच्या अध्यक्षा आणि वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तोफ डागली आहे. बुधवारी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या संयुक्त बैठकीत बोलताना त्यांनी सरकारची कार्यपद्धती, रोजगार आणि सामाजिक सलोखा याबाबतची गेल्या पाच वर्षातील कामगिरीवरुन मोदींना ब्लफमास्टर असे संबोधत जोरदार टीकाकेली.
सोनिया म्हणाल्या, मोदी सरकारने 2014 मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत, त्यामुळे त्यांनी देशातील जनतेचा विश्वासघात केला आहे. मोदी सरकारमध्ये संसद अस्वस्थ आणि कमकुवत बनली आहे. वादविवाद आणि चर्चा गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. राहुल गांधी हे सध्या विविध महत्वाच्या मुद्द्यावरुन मोदींना घेरत आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बेरोजगारी, नोटाबंदीचा घोटाळा, राफेल डीलमुळे मोदी सरकारची विश्वासार्हता लयाला गेली असल्याचे सोनिया यावेळी म्हणाल्या.