छत्तीसगढचे ‘मुख्यमंत्री भूपेश बघेल’ यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार जाहीर

गुरूवार, 25 नोव्हेंबर 2021 (08:27 IST)
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना देण्यात येणार आहे. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. सदर पुरस्कार दि.२८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता समता भूमी, फुले वाडा, पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या सोहळ्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर तसेच समता परिषदेचे पदाधिकारी व राज्यभरातून समता सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
 
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्यात येतो. या अगोदर माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार, माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, खा.शरद यादव, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, ज्येष्ठ लेखक डॉ.भालचंद्र नेमाडे, डॉ.बी.एल.मुणगेकर, लेखिका अरुंधती रॉय, प्रा.डॉ.मा.गो.माळी, ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. तात्याराव लहाने, प्रा.हरी नरके यांच्यासह अनेक दिग्गजांचा समता पुरस्काराने गौरव करण्यात आलेला आहे.
 
यंदाच्या वर्षी या पुरस्कारासाठी छत्तीसगढ राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आपल्या कार्यकाळ समाजातील उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. ओबीसींची स्वतंत्र जनगणना सुरु करणारे देशातील छत्तीसगढ हे प्रथम राज्य असून त्याची यशस्वी अंमलबजावणी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून केली जात आहे. त्यांनी राजकीय कार्यासोबत आपल्या कार्यातून महात्मा जोतीराव फुले यांचा सामाजिक वारसा विकसित केला. त्यांनी केलेल्या अलौकिक कार्याची दखल घेत त्यांना अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सन २०२१ चा मानाचा ‘समता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती