झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांचा राजीनामा,हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

गुरूवार, 4 जुलै 2024 (00:12 IST)
झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन राजीनामा सुपूर्द केला आहे. चंपाई सोरेन यांनी यापूर्वीच राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. आज दुपारपासूनच राज्याच्या राजकारणात खलबते सुरू झाली होती. आता मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते असतील हे निश्चित झाले आहे.
 
राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर चंपाई सोरेन म्हणाले, 'बैठकीत हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याला सर्व आमदारांनी सहमती दर्शवली आहे.
हेमंत सोरेन हेच ​​आमचे नेते असतील, असा निर्णय आमच्या आघाडीतील सर्वांनी पुन्हा घेतला आहे. मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. आमच्या युतीच्या निर्णयानुसार आम्ही काम केले आहे.
 
हेमंत सोरेन हे झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते असतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला काँग्रेसचे झारखंडचे प्रभारी गुलाम अहमद मीर, प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर, हेमंत सोरेन यांचे भाऊ बसंत सोरेत आणि पत्नी कल्पना सोरेन उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची तब्बल पाच महिन्यांनी 28 जून रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. 31 जानेवारीला अटक झाल्यानंतर हेमंत यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
2 फेब्रुवारी रोजी चंपाई सोरेन यांनी झारखंडचे बारावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती