राहुल गांधी म्हणतात, 'भाजप मॅच फिक्सिंगचा प्रयत्न करतेय'

रविवार, 31 मार्च 2024 (15:54 IST)
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 'मॅच फिक्सिंग' करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या रामलीला मैदानातील सभेत केला आहे. पण संपूर्ण विरोधी पक्ष भाजपची ही योजना हाणून पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं."लोकांनी पूर्ण जोर लावून मतदान केलं नाही, तर हे मॅच फिक्सिंगमध्ये यशस्वी होतील. ज्यादिवशी यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल, त्यादिवशी आपलं संविधान नष्ट होईल," असं राहुल गांधी म्हणाले."ज्या दिवशी संविधान संपुष्टात आलं, त्यादिवशी आपल्यावर फार मोठा आघात होईल," असंही ते म्हणाले.
 
"ही काही एखादी साधी निवडणूक नाही. ही संविधान वाचवण्यासाठीची, देश वाचवण्यासाठीची, वंचित आणि गरिबांचा हक्क वाचवण्यासाठीची निवडणूक आहे. या निवडणुकीत स्पष्टपणे मॅच फिक्सिंग दिसत असल्याचं भाजपचेच लोक म्हणत आहेत."
 
"मोदींनी निवडणूक आयोगात त्यांचे लोक भरले. देशातील दोन मुख्यमंत्री राहिलेल्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकलं," असा आरोपही राहुल गांधींनी केला.
 
"त्यांनी आमचं बँक अकाऊंटही बंद केलं. त्यांना हे करायचं होतं तर सहा महिन्यांपूर्वी किंवा सहा महिन्यांनंतरही करता आलं असतं. पण हे सर्व काही निवडणुकीमुळं करण्यात आलं."
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ झालेल्या सभेत विरोधी पक्षाचे नेते दिल्लीतील रामलीला मैदानावर उपस्थित होते. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यांनी अब की बार भाजपा तडीपार नारा देत केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला.रामलीला मैदानावरील इंडिया आघाडीच्या आंदोलनात उद्धव ठाकरे म्हणाले की, "ही काही निवडणुकीची सभा नाही. आपणास माहिती आहे की आपल्या दोन भगिनी मोठ्या हिमतीने लढत आहेत आणि त्यामुळे हे आपलं कर्तव्य आहे की आपण त्यांना साथ दिली पाहिजे. कल्पना (सोरेन) आणि सुनीता (केजरीवाल) यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अजिबात चिंता करू नका या लढाईत संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे.
 
देशात काय परिस्थिती आहे हे मी पुन्हा इथे सांगणार नाही. काही काळापूर्वी आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याची शंका वाटत होती पण आता हे वास्तवात उतरलं आहे. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक केल्यावर लोक घाबरतील असं जर का भाजप सरकारला वाटत असेल तर त्यांनी अजून या देशात राहणाऱ्या लोकांना ओळखलंच नाही.
 
सुनीता केजरीवाल आणि कल्पना सोरेन कडाडल्या
माझ्या देशातील प्रत्येक नागरिक हा घाबरणारा नाही तर लढणारा आहे. आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत तर भाजपच्या सहकारी पक्षांमध्ये ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय आहेत.
 
पण आता वेळ आली आहे की आपण कितीदिवस आणखीन टीका करणार आहोत? मी संपूर्ण देशाला हे आवाहन करू इच्छितो की एक पक्ष आणि एका नेत्याचं सरकार उलथवून टाका आणि सगळ्या राज्यांचा सन्मान करणारं सरकार या देशात आणलं पाहिजे.
 
आम्ही इथे निवडणुकीच्या प्रचाराला आलेलो नाही आम्ही लोकशाही वाचवायला आलो आहोत. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं जातंय हा काय प्रकार आहे? ज्या नेत्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते त्यांनाच भाजपने त्यांच्या पक्षात घेतलं. हे भ्रष्ट लोक देशाचा विकास करू शकतील का?
 
कुणीतरी म्हणाल की भाजपने या सभेला "चोरांची सभा" असं म्हटलं आहे तुम्ही सगळे चोर आहात का? दिल्लीत आंदोलन करायला येणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मी संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की जे सरकार शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतं त्या सरकारला दिल्लीत येण्यापासून रोखलंच पाहिजे.
 
ते म्हणतात की अब की बार चार सौ पार, पण मी आता एक नवीन घोषणा देतो की 'अब की बार भाजपा तडीपार'. हुकूमशाही सरकार आपण दिल्लीत येऊ देणार नाही अशी शपथ घेऊ."
 
अरविंद केजरीवाल यांचं तुरुंगातून पत्र
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या की, "आज तुमचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून एक संदेश पाठवला आहे.
 
हा संदेश वाचण्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पतीला तुरुंगात टाकलं, त्यांनी हे योग्य केलं का? केजरीवाल हे एक खरे देशभक्त आणि इमानदार व्यक्ती आहेत यावर तुमचा विश्वास आहे का? भाजपवाले म्हणतायत की केजरीवाल तुरुंगात आहेत त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? तुमचे केजरीवाल सिंह आहेत. ते फारकाळ तुरुंगात राहणार नाहीत.
 
करोडो लोकांच्या हृदयात केजरीवाल राहतायत. ज्या धाडसाने ते देशासाठी लढत आहेत त्यावरून मला अनेकदा असं वाटतं की या लढाईसाठी केजरीवालांना पाठवण्यात आलं आहे.
सुनीता केजरीवाल यांनी अरविंद केजरीवाल यांनी लिहिलेलं पत्र सभेला आलेल्या लोकांसमोर वाचून दाखवलं. त्या म्हणाल्या की,
 
"माझ्या प्रिय देशवासींनो मी आज तुम्हाला मत मागत नाहीये. आगामी निवडणुकांमध्ये मी कुणाला जिंकवण्याचं किंवा हरवण्याचं आवाहन करत नाहीये. आज मी आपल्या देशाला एक महान भारत देश बनवण्यासाठी तुमचं सहकार्य मागतो आहे.
 
भारत एक महान देश आहे. आपली संस्कृती हजारो वर्षं जुनी आहे. आपल्याकडे देवाने दिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तरीही आपण मागास का आहोत? आपले लोक अशिक्षित का आहेत? देशात गरिबी का आहे? मी सध्या तुरुंगात आहे. इथे विचार करायला खूप वेळ मिळतो. रात्री अनेकवेळा झोपमोड होते.
 
आपली भारतमाता खूप दुःखी आहे, तिला त्रास होतोय. ती या वेदनेने विव्हळत आहे. महागाईमुळे लोकांना दोनवेळच पोटभर जेवण मिळत नाही तेंव्हा या मातेला खूप त्रास होतो. या देशातल्या लहान मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही, लोकांचा उपचारांअभावी मृत्यू होतो तेंव्हा भारतमातेला असह्य वेदना होतात.
 
देशात अजूनही कित्येक ठिकाणी वीज पोहोचली नाही, रस्ते नाहीत हे बघून आपल्या भारतमातेला त्रास होतो. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही ही परिस्थिती बघून तिला त्रास होतो.
 
यावर काही नेते रात्रंदिवस मोठमोठी भाषणं ठोकतात, ऐषोआरामचं आयुष्य जगतात, मित्रांसोबत मिळून देश लुटतात तेंव्हा तिला खूप राग येतो. अशा लोकांचा भारतमाता द्वेष करते. चला आपण सगळे मिळून एका नवीन देशाची निर्मिती करू. 140 कोटी लोकांच्या स्वप्नांचा भारत बनवू. जिथे प्रत्येक व्यक्तीचं पोट भरलेलं असेल, प्रत्येकाच्या हातात रोजगार असेल, एकही व्यक्ती या देशात गरीब नसेल, एकही व्यक्ती निरक्षर नसेल, श्रीमंत गरिबी कुणीही असो प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळेल, उपचार मिळतील, देशाच्या कानाकोपऱ्यात वीज असेल, चांगले रस्ते असतील. एक असा देश असेल जो संपूर्ण जगाचं केंद्र असेल.
 
एक असा देश बनवू जो विज्ञान आणि तंत्रज्ञानात महासत्ता असेल. एक असा देश बानू जिथे सगळे समान असतील, सगळ्यांना न्याय मिळेल. प्रेम असेल बंधुभाव असेल. आज मी 140 कोटी लोकांना असा देश बनवण्याचं आवाहन करतोय. जर तुम्ही सगळ्यांनी मिळून इंडिया आघाडीला विजय केलं तर आपण असा देश नक्कीच बनवू शकू. इंडिया केवळ नावात नाही तर आमच्या हृदयात आहे.
 
आज मी देशातल्या नागरिकांना इंडिया आघाडीकडून सहा वचन देतो - अरविंद केजरीवाल
पहिलं वचन संपूर्ण देशात 24 तास वीज असेल.
संपूर्ण देशातील गरिबांना मोफत वीज मिळेल.
प्रत्येक गाव आणि शहरात दर्जेदार सरकारी शाळा बनवू.
प्रत्येक गाव आणि गल्लीत मोहल्ला क्लिनिक बनवू, प्रत्येक जिल्ह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बनवू.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य भाव देऊ
दिल्लीकरांनी 75 वर्षांपासून अन्याय सहन केला आहे, त्यांनी निवडून दिलेलं सरकार पंगू आहे, हा अन्याय आम्ही दूर करू, दिल्लीकरांना त्यांचा हक्क मिळवून देऊ, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देऊ.
झारखंड झुकणार नाही, इंडिया झुकणार नाही आणि इंडिया थांबणार नाही - कल्पना हेमंत सोरेन
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन म्हणाल्या की, "आज या मंचावर मी आपल्या देशातल्या पन्नास टक्के महिला आणि नऊ टक्के आदिवासींचा आवाज बनून उभी आहे. आम्हा आदिवासींची कहाणी ही एका प्रदीर्घ संघर्ष आणि बलिदानाची कहाणी आहे. कारण आमचा इतिहास अनेक शतकांच्या संघर्षाचा, रक्ताळलेल्या लढाईचा इतिहास आहे. आम्हा आदिवासींना आमच्या इतिहासाचं अभिमान आहे.
 
या देशातली लोकशाही संपवण्यासाठी काही हुकूमशहांनी जे प्रयत्न चालवले आहेत त्यांचा शेवट करण्यासाठी आज हा जनसमुदाय इथे उसळला आहे. इंडिया आघाडीची ताकद आज वाढली आहे.
 
बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला प्रत्येक हक्क एनडीए सरकार हिरावून घेत आहे. या सरकारने प्रत्येक संविधानिक मूल्य पायदळी तुडवलं आहे. या देशातील सामान्य नागरिकांवर अन्याय होतोय.
 
तुम्हाला देश वाचवायचा असेल, लोकशाही वाचवायची असेल, हक्क आणि अधिकार वाचवायचे असतील तर इंडिया आघाडीला विजयी करावं लागेल. हेमंत सोरेन दोन महिन्यांपासून तुरुंगात आहेत, अरविंद केजरीवाल दहा दिवसांपासून तुरुंगात आहेत. पण कोणत्या आरोपांखाली त्यांना तुरुंगात टाकलं गेलंय हे सुद्धा सांगितलं नाही. हुकूमशहांची पाळेमुळे आपण या देशातून खोदून काढणार आहोत.
 
मी शेवटी एवढंच म्हणेन झारखंड झुकणार नाही, इंडिया झुकणार नाही आणि इंडिया थांबणार नाही."
 
Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती