Janamashtmi 2023 : जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी मुंबई सज्ज झाली आहे. गोविंदाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. 'गोविंदा' जखमी होण्याची शक्यता लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) खबरदारीचा उपाय म्हणून BMC रुग्णालयांमध्ये आधीच 125 खाटा तयार ठेवल्या आहेत.
मुंबईसह महाराष्ट्राच्या इतर भागात आज दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. हा कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचा एक भाग आहे, जो भगवान कृष्णाच्या जन्माचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. उत्सवादरम्यान हवेत लटकणारी 'दहीहंडी' तोडण्यासाठी 'गोविंदा' मानवी पिरॅमिड तयार करतात.
बीएमसीने सांगितले की, 125 खाटांपैकी 10 सायन हॉस्पिटलमध्ये, सात केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) हॉस्पिटलमध्ये, चार नायर हॉस्पिटलमध्ये आणि उर्वरित शहर आणि उपनगरातील विविध सरकारी हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आले आहेत.
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, जखमी गोविंदांच्या उपचारासाठी या रुग्णालयांमध्ये आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी तीन शिफ्टमध्ये तैनात करण्यात आले असून, त्यांना इंजेक्शन, औषधे आणि शस्त्रक्रियेचे साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.