IAS ते रेल्वेमंत्री असा प्रवास करणाऱ्या अश्विनी वैष्णव यांच्याबद्दल जाणून घ्या..

शनिवार, 3 जून 2023 (15:16 IST)
ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसचा मोठा अपघात झाल्यानंतर मदतकार्य वेगाने सुरू आहे.
 
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरच्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख तर किरकोळ जखमी झालेल्या लोकांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
 
आज 3 जूनच्या सकाळी त्यांनी या अपघातस्थळी भेट देऊन मदतकार्याची पाहाणीही केली. अपघातानंतर अस्ताव्यस्त पडलेल्या डब्यांच्या खाचखळग्यांमधून ते कोणतीही सुरक्षा न घेता फिरले.
 
एका बाजूला त्यांच्या या धाडसाचं कौतुक करताना पंतप्रधान केवळ वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनासाठी येतात, पण रेल्वेमंत्री अपघाताच्या ठिकाणी आधी पोहोचतात, अशी एक चर्चा सोशल मीडियावर दिसून येते.
 
पण त्याचवेळी सोशल मीडियावर नेटकरी तसंच काही राजकीय नेत्यांकडून रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
 
रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याचा विषय निघाल्यानंतर माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
 
सर्व काही सुरळीत सुरू असताना 2017 साली पाच दिवसात घडलेले दोन अपघात त्यांचं पद जाण्यास कारणीभूत ठरले होते. या अपघातांनंतर सुरेश प्रभू यांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
 
त्यामुळे आता विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव काय करतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या पार्श्वभूमीवर अश्विनी वैष्णव यांच्या IAS ते मंत्रिपदापर्यंतच्या प्रवासाची माहिती आपल्याला असणंही क्रमप्राप्त आहे.
 
मोदी सरकारमधील उच्चशिक्षित मंत्री
नरेंद्र मोदी यांच्या विद्यमान मंत्रिमंडळात एक उच्चशिक्षित मंत्री म्हणून अश्विनी वैष्णव यांची ओळख आहे. माजी प्रशासकीय अधिकारी असलेल्या एस. जयशंकर यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान देऊन 2019 मध्ये नरेंद्र मोदींनी सर्वांना एक सरप्राईज दिलं होतं.
 
त्याच प्रकारे 2021 मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात अश्विनी वैष्णव यांचं नाव हे सर्वांच्या भुवया उंचावणारं ठरलं होतं.
 
18 जुलै 1970 रोजी जोधपूरमध्ये जन्मलेल्या अश्विनी यांनी सुरुवातीला युनिव्हर्सिटी ऑफ जोधपूरमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन विषयात इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली.
 
त्यानंतर त्यांनी IIT कानपूरमधून त्यांनी इंडस्ट्रियल मॅनेजमेंट विषयात M.Tech पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
 
ते वर्ष होतं 1994. याच वर्षी त्यांनी UPSC नागरी सेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS पदापर्यंत मजल मारली. भारतीय नागरी सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी ओडिशा कार्यक्षेत्रात विविध पदांवर काम केलं. विशेष म्हणजे, कालचा अपघात घडलेल्या बालासोर या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून ते कार्यरत होते.
 
याठिकाणी एका वादळादरम्यान त्यांनी केलेल्या बचावकार्याच्या कामाचं अजूनही उदारहण दिलं जात असतं.
 
दरम्यान, त्यांच्या कामाची पावती म्हणून अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात पंतप्रधान कार्यालयात करण्यात आली होती. 2004 साली अटलबिहारी वाजपेयींचा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांना पंतप्रधान कार्यालयातून बाहेर पडले.
 
2006 मध्ये अश्विनी वैष्णव यांना गोव्यातील मुरगाव पोर्ट ट्रस्ट येथे व्यवस्थापक म्हणून पाठवण्यात आलं. पोर्ट ट्रस्टमध्ये काही काम काम केल्यानंतर 2008 मध्ये त्यांनी पुढे परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.
 
यानंतर शैक्षणिक रजा घेऊन अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ पेनिसिल्व्हेनिया येथील व्हार्टन बिझनेस स्कूल येथे त्यांनी MBA च्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
 
IAS ते उद्योजक
अमेरिकेतील विद्यापीठातून MBA करून अश्विनी वैष्णव परतले ते आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा हातात घेऊनच.
 
अश्विनी वैष्णव यांचं पूर्वीपासूनच उद्योजक होऊन स्वतःला सिद्ध करण्याचं स्वप्न होतं. त्यामुळे 2011 मध्ये आपल्या IAS पदाचा त्याग करून त्यांनी वेगळी वाट धरली.
 
कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना त्यांनी या क्षेत्रात हातपाय हलवणं सुरू केलं. सुरुवातीला जनरल इलेक्ट्रिक ट्रान्सपोर्टेशनमध्ये दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर सिमेन्स कंपनीत शहरी पायाभूत सुविधा विभागाचे ते प्रमुख बनले.
 
यादरम्यान गुजरातमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रात होत असलेले बदल त्यांनी टिपले. कमी गुंतवणूक, कमी धोका असं धोरण स्वीकारून त्यांनी सुझुकी, होंडा आणि हिरो यांच्यासारख्या कंपन्यांसोबत काम केलं. तसंच ओडिशामध्ये आयरन-ऑक्साईड पेलेट निर्मितीचा एक कारखानाही त्यांनी उभा केला. हा व्यवसाय काही काळानंतर बंद झाला.
 
भाजपतर्फे राज्यसभा आणि दोन वर्षांत मंत्रिपद
नरेंद्र मोदी सरकार दुसऱ्यांदा स्थापन झालं त्यावेळी म्हणजेच 2019 साली अश्विनी वैष्णव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
 
भाजपमध्ये प्रवेश करून 6 दिवसच झाले होते की त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं. ओडिशामध्ये त्यांनी केलेलं काम पाहता भाजपने त्यांना याच राज्यातून राज्यसभेवर पाठवलं.
 
पुढे, मंत्रिमंडळ विस्तारात जुलै 2021 मध्ये अश्विनी वैष्णव यांची थेट रेल्वे मंत्रिपदावर वर्णी लागली.
 
रेल्वे मंत्रिपदासोबतच दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान या खात्यांचं मंत्रिपदही वैष्णव यांना देण्यात आलं.
 
वैष्णव आणि वाद
इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, अश्विनी वैष्णव हे ओडिशामध्ये कार्यरत असताना तेथील सत्ताधारी बिजू जनता दलासोबत त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते.
 
नंतर पंतप्रधान अटलबिहारी यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयातील स्वीय सहायक म्हणून जबाबदारी मिळाली.
 
नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानापासून त्यांचा अनेक तंत्रज्ञानविषयक गोष्टींमध्ये सल्ला घेत असत. मोदी दिल्लीला गेल्यानंतरच त्यांच्यातील संपर्क कायम होता.
 
2019 मध्ये भाजपने वैष्णव यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर बिजू जनता दलाने त्यांना पाठिंबा दर्शवला. त्याला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला होता. वैष्णव यांचे अनेक खाणमाफियांशी संबंध आहेत, असे आरोप त्यावेळी त्यांच्यावर करण्यात आले. 2013 मध्ये ओडिशात समोर आलेल्या बी. प्रभाकरन खाण घोटाळ्याशी त्यांचं नाव जोडण्यात आलं होतं.
 
पण, वैष्णव यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावला. कोणत्याही चौकशीसाठी आपण तयार आहोत, सत्य बाहेर येईल, असं त्यांनी म्हटलं होतं.
 
वंदे भारत एक्सप्रेसवरून टीका
बालासोरमधील कोरोमंडल एक्सप्रेसच्या अपघातानंतर आता अश्विनी वैष्णव यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून वैष्णव हे सातत्याने वंदे भारत एक्सप्रेसचा पुरस्कार करताना दिसतात.
 
पण वंदे भारतसारख्या महागड्या गाड्या आणण्याऐवजी आहे त्या रेल्वेंची आणि रेल्वेमार्गांची स्थिती सुधारावी, अशी मागणी सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
 
तृणमूल काँग्रेस नेते सौगत रॉय यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हटलं, “तुम्ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करत आहात. फक्त वंदे भारत चालवून काम होणार नाही. या अपघाताची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. वैष्णव यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.”
 
रेल्वे प्रशासनाने रेल्वे अपघात टाळण्याच्या दृष्टीने कवच नामक एक यंत्रणा लागू केली होती. कवच यंत्रणेत कोणत्याही रेल्वे गाड्या एकाच ट्रॅकवर आल्यास त्या आपोआप थांबतील, असा दावा करण्यात आला होता.
 
पण कालच्या अपघातात कवच यंत्रणेचं काय झालं, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
 
दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेले असून भविष्यात अशा घटना होऊ न देण्याची दक्षता घेऊ, असंही वैष्णव यांनी म्हटलं.
 
पण, सोशल मीडियावर त्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्याच वेगाने जोर धरत असून यासंदर्भात वैष्णव नेमका काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती