भारतातील फरारी उद्योगपती विजय मल्ल्या आणि नीरव मोदी यांना मागे टाकत आता दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्ये सुमारे 15 हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. पॅन कार्ड डेटा आणि हजारो लोकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा नोएडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीने शेल कंपन्या तयार करून देशभरात सरकारी तिजोरीचे नुकसान केले. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी किंगपिनसह आठ जणांना अटक केली आहे.
आरोपी दिल्ली-गाझियाबादमध्ये तीन ठिकाणी कार्यालये उघडून फसवणूक करत होते. बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केलेल्या 2600 हून अधिक कंपन्यांची यादीही आरोपींकडून मिळाली आहे. पोलिसांनी सूत्रधार दीपक मुर्जानी, विनिता, अश्वनी, यासीन, आकाश सैनी, राजीव, अतुल आणि विशाल यांना दिल्लीतून अटक केली आहे.
ही टोळी 2660 बनावट कंपन्यांच्या माध्यमातून देशभरात फसवणूक करत होती. टोळीतील आठ आरोपींकडून आठ लाख लोकांच्या पॅनकार्ड तपशिलांसह बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. एका चार्टर्ड अकाउंटंटला (सीए) पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पश्चिम बंगाल, दिल्ली, गाझियाबाद आणि चंदीगड येथे छापे टाकले.