उत्तर प्रदेश पोलीस दलात शिपाई असणारे सूरजपाल जाटव कसे बनले 'भोले बाबा'? त्यांच्या कार्यक्रमात कशी झाली चेंगराचेंगरी?

बुधवार, 3 जुलै 2024 (14:46 IST)
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील सिकंद्राराऊ परिसरातील पुलराई गावात आयोजित एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 122 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
हा सत्संग नेमका कुणाचा होता? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
हा सत्संग नारायण साकार हरी नामक कथावाचकाचा असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या नावाचे पोस्टरही हाथरस शहरातील रस्त्यांवर लावण्यात आले होते. हे कथावाचक 'भोले बाबा' आणि 'विश्व हरी' नावानेही परिचित आहे.
 
जुलैच्या पहिल्या मंगळवारी आयोजित या कार्यक्रमाला 'मानव मंगल मिलन' असे नाव देण्यात आले होते. मानव मंगल सद्भावना समागम समिती या कार्यक्रमाची आयोजक होती.
 
या समितीतील सहा आयोजकांची नावेही समोर आली आहेत, मात्र त्यांचे मोबाईल बंद येत आहेत. स्थानिक पोलीस प्रशासनाचाही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
 
दरम्यान, या सत्संग कार्यक्रमाचे आयोजक आणि संबंधित बाबा यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे अलिगढचे पोलीस महानिरीक्षक शलभ माथूर यांनी सांगितले.
 
"आयोजक मंडळाचे सदस्य आणि भोले बाबा यांचा शोध घेणं सुरु आहे. मात्र, त्या सर्वांनी आपापले मोबाईल बंद करून ठेवले असल्याने त्यांच्या ठिकाणाविषयी नेमकी माहिती मिळण्यास अडचण येत आहे," असे ते म्हणाले.
 
सूरजपाल जाटव हे भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी कसे बनले?
या सत्संग कार्यक्रमातील कथावाचक बाबाचा इतिहास एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. सूरजपाल जाटव असे या बाबाचे मूळ नाव असून पोलीस शिपाई पदाची नोकरी सोडून त्यांनी हा मार्ग अवलंबला होता, व बघता बघता लाखो अनुयायीही बनवले.
 
नारायण साकार हरी हे एटा जिल्ह्यातून वेगळ्या झालेल्या कासगंज जिल्ह्यातील पटियाली प्रभागातील बहादूरपूर गावाचे रहिवासी आहे.
 
उत्तर प्रदेश पोलीस दलात स्थानिक अभिसूचना युनिटमध्ये ते कार्यरत होते. तब्बल 18 पोलीस ठाणे आणि स्थानिक अभिसूचना शाखेत त्यांनी सेवा दिली होती.
 
28 वर्षांपूर्वी एका विनयभंगाच्या प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरुन त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.
 
विनयभंग प्रकरणात दोषी आढळल्याने सूरजपाल यांना बडतर्फ करण्यात आलं व त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
 
ऐटा तुरुंगात प्रदीर्घ काळ शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर सूरजपाल हे 'बाबा' बनूनच लोकांसमोर आले.
 
पुन्हा सेवेत घेतल्यानंतर नोकरी सोडण्याचा निर्णय
पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आल्यानंतर सूरजपाल यांनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून शरणागती पत्करल्याने त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करुन घेण्यात आलं होतं. मात्र 2002 साली त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
 
निवृत्तीनंतर ते काही दिवस आपल्या मूळ गावी नगला बहादूरपूर येथे राहिले. तेथे काही दिवस राहिल्यानंतर आपला ईश्वराशी संवाद होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच स्वतःला भोले बाबा या नावाने प्रस्थापित करण्यास सुरुवात केली.
 
थोड्याच कालावधीत त्यांचे अनेक अनुयायी तयार झाले. भक्त त्यांना वेगेवेगळ्या नावाने संबोधत. त्यांच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी होण्यास सुरुवात झाली.
 
इटावाचे पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितले की, "75 वर्षीय सुरजपाल उर्फ भोले बाबा हा तीन भावांत सर्वात मोठा भाऊ आहे. भगवानदास या त्याच्या दुसऱ्या क्रमांकाच्या भावाचं निधन झालं असून त्याच्या धाकट्या भावाचे नाव राकेश कुमार असे आहे. राकेश कुमार हा काही काळ गावचा सरपंचदेखील राहिलेला आहे."
 
बहादूरपूर गावात भोले बाबा यांची चॅरिटेबल ट्रस्ट आजही सक्रिय आहे. आपल्याला सरकारी नोकरीतून अध्यात्मिक क्षेत्राकडे कुणी खेचून आणले याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा दावा सूरजपाल उर्फ भोले बाबा आपल्या सत्संगांमधून करत असतात.
 
दक्षिणा न घेता अनेक आश्रमांची उभारणी
आश्चर्यकारक बाब म्हणजे भोले बाबा उर्फ नारायण साकार हे आपल्या भक्तांकडून कोणत्याही प्रकारची देणगी, दान अथवा दक्षिणा स्वीकारत नाही. असे असूनही त्यांनी अनेक आश्रम स्थापन केले आहेत.
 
उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर त्यांनी आश्रम उभारले आहेत.
 
नारायण साकार हरी हे आपल्या सत्संगांमध्ये भक्तांची सेवा करतानाही दिसून येतात.
 
अर्थात, हे सगळं भक्तांमध्ये लोकप्रिय होण्याच्या हेतूनेच केलं जात असल्याचं बोललं जातं.
 
बाबा कधी साध्या वेशात, तर कधी सुटाबुटात
नारायण साकार उर्फ भोले बाबा पांढरे वस्त्र परिधान करतात. ते कधी कुर्ता पायजमा कधी पँट-शर्ट तर कधी सुटाबुटाही वावरताना दिसतात. ते समाजमाध्यमांवर फारसे परिचित नाही. त्यांच्या फेसबुक पोस्टलाही फारसे लाईक नसतात.
 
मात्र, वास्तवात त्यांच्या भक्तांची संख्या लाखोंमध्ये आहे. त्यांच्या प्रत्येक सत्संगाला हजारोंची गर्दी असते.
 
शेकडो स्वयंसेवक आणि स्वयंस्वसेविका त्यांच्या सत्संग कार्यक्रमात सेवा देतात. सत्संग कार्यक्रमात जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनेक स्वयंसेवक आणि भक्त समिती स्वयंस्फुर्तीने राबते.
 
सत्संग कार्यक्रमांना परवानगी न देण्याची करण्यात आली होती मागणी
उत्तर प्रदेश पोलीस दलात परिमंडळ अधिकारी म्हणून निवृत्त झालेले रामनाथ सिंह यादव सांगतात, "तीन वर्षांपूर्वी इटावा येथील एका मैदानावर त्यांचा सत्संग कार्यक्रम एक महिना चालला होता. त्यावेळीही चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
 
त्या परिसरातील रहिवाशांनी भविष्यात या बाबांच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे केली होती.
 
Published By- Dhanashri Naik 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती