गुरुग्राम : प्रेम विवाह केल्याने आई-वडिलांनी मुलासह घेतला मुलीचा जीव, हत्येनंतर केले अंत्यसंस्कार

शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (12:34 IST)
मुलीने मनाच्याविरुद्ध जाऊन प्रेम विवाह केल्यामुळे रागावलेल्या आई-वडिलांनी मुलासह आपल्याच पोटच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना हरियाणातील गुरुग्राम येथे घडली आहे. आरोपींनी मृतदेह झज्जरला नेला आणि पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. प्रेमविवाहात मुलगा ब्राह्मण कुटुंबातील तर मुलगी जाट कुटुंबातील होती. या प्रकरणी पोलिसांनी 48 तासांत आरोपीला अटक केली. आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला असून तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
झज्जरच्या सुरहेती  गावातील रहिवासी असलेल्या संदीपने धनकोट चौकीचे प्रभारी प्रदीप यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तो त्याची पत्नी अंजलीसोबत आरओएफ सोसायटी, सेक्टर-102, गुरुग्राममध्ये राहत होता. 19 डिसेंबर 2022 रोजी त्याने त्याच्याच गावातील अंजलीसोबत प्रेमविवाह केला होता. अंजली बीएससीची विद्यार्थिनी होती आणि ती जाट कुटुंबातील होती, तर तो ब्राह्मण आहे.

अंजलीचा भाऊ आणि आई-वडील त्यांच्या प्रेमविवाहामुळे खूश नव्हते आणि तिला धडा शिकवण्याची संधी शोधत होते. त्यामुळे अंजलीचा भाऊ कुणाल आणि त्याची पत्नीही अंजलीसोबत गुरुग्राममध्ये राहू लागले. कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून हत्येचा कट रचत होते. संदीपने सांगितले की, 17 ऑगस्ट रोजी तो सणानिमित्त बहिणीकडे गेला होता. कुणालची पत्नी तिच्या कामावर गेली. यावेळी अंजली फ्लॅटवर एकटीच होती.

संधी मिळताच कुणालने वडील कुलदीप आणि आई रिंकी यांना फोन केला. यानंतर कुणाल आणि रिंकीने अंजलीला पकडून वडील कुलदीपने अंजलीचा गळा आवळून खून केला. गुन्हा केल्यानंतर आरोपींनी मृतदेह कारमध्ये ठेऊन  त्यांच्या मूळ गावी सुरहेती येथे नेले. जिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे अंजलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ शकले नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी आई-वडील आणि भावाला 48 तासांत अटक केली. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तरुणी ज्या तरुणावर प्रेम करत होती तो पबमध्ये बाऊन्सर आहे. मृताचे वडील सोहना परिसरात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कर्मचारी आहेत. कुणालची पत्नी कॉल सेंटरमध्ये काम करते. घटनेच्या वेळी ती कामावर गेली होती. अंजलीचा खून केल्यानंतर कुणालने त्याच्या मित्राची अल्टो कार मागितली होती. तेथून ते मूळ गावी गेले होते. पोलीस आरोपींच्या मागावर गाडी जप्त करण्यात गुंतले आहेत.
 
पोलीस पथकाने गुरुवारी गावातील स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारासाठी अस्थिकलश गोळा केले . ते फॉरेन्सिक तपासणीसाठी मधुबनच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलीस हत्येशी संबंधित पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. तिची सीसीटीव्ही फुटेजही तपासली जात आहे.
 




Edited by - Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती