शेतकरी आंदोलन : दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

मंगळवार, 26 जानेवारी 2021 (17:18 IST)
प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला ठिकठिकाणी हिंसक वळण लागलं असून पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या हिंसक आंदोलना दरम्यान दिल्लीच्या डीडीयू मार्गावर ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तसेच दिल्ली-हरयाणा सिंघू सीमेवर एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सोनीपतच्या मादीना गावातील हा शेतकरी असून ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे आंदोलन स्थळी त्याचे निधन झाले असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मागच्या दोन महिन्यापासून शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले जेव्हा बॅरिकेडस तोडून शेतकऱ्यांनी दिल्लीत प्रवेश केला. दिल्लीच्या अनेक भागात पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमकी झाल्या. यावेळी ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स तोडले आहेत, तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
 
दरम्यान ट्रॅक्टर परेड शांततामय पद्धतीने करायची होती हा आमचा सहमतीने घेतलेला निर्णय होता. मात्र ज्या पद्धतीने गोष्टी घडल्या आहेत ते योग्य नाही असं शेतकरी नेत्याने सांगितलं. 
 
परिस्थिती चिघळल्यानंतर आंदोलक तलवारी काढून पोलिसांच्या मागे लागले होते. त्यांनी लाल किल्ल्यामध्ये प्रवेश करुन तिथल्या खांबावर झेंडा फडकवला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती