‘तितली’ चक्रीवादळ आंध्रप्रदेश, ओडिशामध्ये धडकले

गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (11:38 IST)
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘तितली’ चक्रीवादळ आज आंध्रप्रदेशच्या उत्तर भागात आणि दक्षिण ओडिशामध्ये धडकले. यामुळे गोपाळपूरमध्ये समुद्रात मच्छिमारांची एक बोट बुडाली असून यामध्ये ५ मच्छिमार होते, पाचही जणांना वाचविण्यात यश आले आहे. तर आंध्रप्रदेशमध्ये श्रीकाकुलाम जिल्ह्यात भूत्सखलन झाले असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
 
गोपाळपूरमध्ये चक्रीवादळाची गती १४० ते १५० किमी प्रति तास आहे. तर चक्रीवादळाची ही गती वाढून १६५ किमी प्रति तास होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. वादळाची तीव्रता पाहता ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरील तीन लाख लोकांना सुरक्षित जागी स्थलांतरित करण्यात आले आहे. तर मदत व बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.
 
तितली चक्रीवादळाच्या पार्श्ववभूमीवर ओडिसा सरकारने पुरी, गजपती, जगतसिंहपूर या भागांमधील शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. 12 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती