तुरुंगात परत जाण्यापूर्वी अरविंद केजरीवालांनी दिल्लीकरांना म्हटलं, की...
शुक्रवार, 31 मे 2024 (18:19 IST)
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 दिवसांसाठी जामीन मंजूर केला होता. मद्य धोरणप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली होती.निवडणूक प्रचारासाठी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला होता आणि आता या 21 दिवसांच्या जमिनीची मुदत 1 जूनला संपणार आहे.
त्यामुळे 2 जून रोजी त्यांना तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे. त्याआधी त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिल्लीतील जनतेशी संवाद साधला.
केजरीवाल यांनी प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत जामिनाची मुदत वाढवून मागितली होती पण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनेच केजरीवाल यांचा हा अर्ज फेटाळून लावला.
दिल्लीच्या जनतेला उद्देशून तयार करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये केजरीवाल म्हणाले की, "मी आता पुन्हा तुरुंगात जाणार आहे. मला माहीत नाही यावेळी ते मला किती दिवस, किती महिने तुरुंगात ठेवतील.
देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जातोय याचा मला अभिमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाची मुदत संपल्यामुळे आता मला पुन्हा तुरुंगात सरेंडर व्हावं लागणार आहे."
केजरीवाल म्हणाले की, "हे यावेळी मला आणखीन त्रास देतील. तुम्ही सगळे स्वतःची काळजी घ्या. मी कुठेही असलो, तुरुंगात असलो, बाहेर असलो तरी दिल्लीकरांचं एकही काम मी थांबू देणार नाही.
मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, महिलांसाठी मोफत बससेवा या सुविधा जशा सुरु होत्या तशाच सुरु राहतील. मी तुरुंगातील बाहेर आल्यानंतर प्रत्येक महिलेला महिन्याला हजार रुपये देण्याची योजनाही सुरु करेन.
मी नेहमी तुमच्या कुटुंबाचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य पार पाडलं आहे. आज मी माझ्या कुटुंबासाठी तुमच्याकडे काही मागत आहे. माझ्या आई वडिलांचं वय झालं आहे. माझी आई सतत आजारी असते, मला तुरुंगात त्यांची खूप काळजी वाटते.
मी तुरुंगात गेल्यावर माझ्या आई वडिलांची काळजी घ्या. देश वाचवताना माझा जीव जरी गेला तरी चिंता करू नका. तुमच्या प्रार्थनांमुळेच आज मी जिवंत आहे. शेवटी एवढंच म्हणेन की देवाची इच्छा असेल तर तुमचा हा मुलगा लवकरच तुरुंगातून परत येईल."
डॉक्टरांनी मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं असं म्हटलं आहे स्वतःच्या प्रकृतीबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, “तुरुंगात मी 50 दिवस होतो. या 50 दिवसांत माझं 6 किलोने वजन कमी झालंय.
तुरुंगात गेलो तेव्हा माझं वजन 70 किलो होतं. आता 64 किलो आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही वजन वाढलं नाही. डॉक्टर म्हणाले की शरीरातील मोठ्या आजाराचं हे लक्षण आहे. त्यासाठी काही चाचण्या करण्याची गरज आहे. माझ्या युरिनमध्ये किटोन पातळी वाढली आहे.”
केजरीवाल १० मे रोजी जामिनावर बाहेर आले होते.
सशर्त जामिनावर न्यायालयाने काय म्हटलं होतं?
कोर्टाने आपल्या आदेशात सांगितलं होतं की, "लोकसभा निवडणूक ही दर पाच वर्षांनी होणारी एक महत्त्वाची घटना आहे. अरविंद केजरीवाल यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही आणि ते 'समाजासाठी धोका' नाहीत."
न्यायालयाने काही अटींसह जामीन देण्याचे आदेश दिले होते. केजरीवाल मुख्यमंत्री कार्यालयात जाणार नाहीत, असं आदेशात सांगितलेलं होतं. तसेच ते कोणत्याही आदेशावर सही करणार नाहीत, दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरयांना एखादा आदेश द्यायचा असल्यास त्यावर केजरीवाल यांच्या स्वाक्षरीची गरज असणार नाही.
केजरीवाल आपल्या विरोधात चालू असलेल्या सध्याच्या खटल्याबाबत कोणतेही वक्तव्य करणार नाहीत आणि या खटल्याशी संबंधित साक्षीदारांशी बोलणार नाहीत.
मात्र, केजरीवाल त्यांचा राजकीय प्रचार करू शकतात.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या सातव्या टप्प्यासाठी उद्या म्हणजेच 1 जून रोजी मतदान होत असून न्यायालयाच्या आदेशानुसार अरविंद केजरीवाल यांना शरणागती पत्करावी लागणार आहे.