New Delhi News: आज शनिवारी 14 डिसेंबर रोजी राजधानी दिल्लीतील एका शाळेला बॉम्बची धमकी मिळाली आहे. या आठवड्यात राष्ट्रीय राजधानीतील शाळांना धमकीचे ई-मेल पाठवण्याची ही तिसरी घटना आहे. यासोबतच राजधानीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. पण, आतापर्यंत तपासात काहीही संशयास्पद आढळले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात दिल्ली अग्निशमन सेवेतील एका अधिकाऱ्याने आज सांगितले की, "आम्हाला सकाळी दिल्ली पब्लिक स्कूल आरके पुरममध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली." तसेच अग्निशमन विभाग, स्थानिक पोलीस, श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथक शाळेत पोहोचले आणि शोध मोहीम सुरू केली. काहीही संशयास्पद आढळले नसून शोधमोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काल शुक्रवारी जवळपास 30 शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती, त्यानंतर अनेक एजन्सींनी शाळेच्या परिसराची झडती घेतली. यापूर्वी सोमवारी, किमान 44 शाळांना अशाच प्रकारचे ईमेल प्राप्त झाले होते. झडतीदरम्यान काहीही संशयास्पद आढळले नाही, तेव्हा पोलिसांनी या धमक्यांना अफवा असल्याचे सांगितले.