जेईई मेन परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर; ‘या’ तारखेला हाेणार परीक्षा

सोमवार, 14 मार्च 2022 (21:29 IST)
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) सत्र 1 ची जेईई मेन २०२२ परीक्षेच्या  तारखांमध्ये बदल केला आहे. जे विद्यार्थी  या परीक्षेला (exam) बसणार आहेत त्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन त्वरित नाेटीस पहावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान NTA ने फक्त सत्र 1 च्या परीक्षेच्या तारखा बदलल्या आहेत हे लक्षात घ्यावे असे देखील आवाहन एनटीएच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
याबाबत अधिक माहिती अशी की, जेईई मेन २०२२ ही परीक्षा १६ ते २१ एप्रिल या कालावधीत होणार होती. तसेच एनटीएने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा २१, २४, २५, २९ एप्रिल आणि ०१ व ०४ मे रोजी होईल. परीक्षेच्या तारखा अनेक बोर्ड परीक्षांच्या तारखांशी जुळत होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन जेईई मेन सत्र १ च्या परीक्षेच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत असे एनटीएने स्पष्ट केले आहे.
 
 
दरम्यान परीक्षेसाठीच्या अन्य सूचना (शहर) एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आणि परीक्षा प्रवेशपत्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केले जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन तपशीलांच्या मदतीने प्रवेशपत्र मिळू शकेल असे आजच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावरुन अधिक माहिती जाणून घ्यावी असे आवाहन एनटीएने केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती