मध्य प्रदेशातील जबलपूर येथील डुमना विमानतळावर शनिवारी सकाळी अलायन्स एअरचे विमान घसरले. दिल्लीहून जबलपूरला विमानात आलेल्या 55 प्रवाशांना काहीही झाले नाही, ही दिलासादायक बाब आहे. प्रत्यक्षात विमान लँडिंगच्या वेळी रनवे वरून घसरले. वैमानिकांनी प्रसंगावधान ठेऊन विमान रनवे वर आणले. डीजीसीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलायन्स एअर फ्लाइटमध्ये 55प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
विमान रनवे वरून घसरून बाजूला असलेल्या मुरुमात अडकले. यामुळे विमानाच्या पुढच्या बाजूला लावलेले लँडिंग फ्रंट व्हील खराब झाले. याची माहिती मिळताच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी धावपट्टीवर पोहोचून विमानातील प्रवाशांचे सांत्वन केले. दिल्ली-जबलपूर विमान ATR-72 विमानाने संचालित केले जाते. विमानाने सकाळी 11:30 वाजता दिल्लीतून उड्डाण केले आणि 1:15 वाजता जबलपूरला उतरवले.
खबरदारी म्हणून विमानतळ अधिकाऱ्यांनी धावपट्टीवर रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अलायन्स एअरचे नियमित विमान अपघातातून कसे वाचले याबाबत अधिकारी मौन बाळगून आहेत. विमानतळ संचालिका यांनी सांगितले की, या घटनेमुळे विमानतळावरील कामकाज चार-पाच तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.