अमित शाह : मणिपूरमध्ये आतापर्यंत 152 लोकांचा मृत्यू, या प्रकरणाचं राजकारण नको
बुधवार, 9 ऑगस्ट 2023 (20:28 IST)
आज (09 ऑगस्ट) ला संसदेत अविश्वास ठरावावर पुन्हा चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी मणिपूरच्या हिंसाचारावरून सरकारवर टीका केली.केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी अविश्वास प्रस्तावादरम्यान मणिपूरबद्दल विरोधकांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर दिलं.
मणिपूरमध्ये हिंसाचाराचं तांडव चाललंय हे कोणीही नाकारू शकत नाही. आत्तापर्यंत 152 लोकांचा यात मृत्यू झाला असून या प्रकरणाचं कोणीही राजकारण करू नये, असं अमित शाह यांनी म्हटलं.
अमित शाह यांनी म्हटलं की, गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षात कोणीही डोळे झाकून झोपलेलं नाही.
त्यांनी म्हटलं, "मे महिन्यात 107 लोक मारले गेले आणि ऑगस्टमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला."
"मला सांगायचं आहे की हिंसाचार कमी होतोय, पण कोणी आगीत तेल टाकायचं काम करू नये."
अमित शाह यांनी म्हटलं की, मणिपूरमध्ये मागील साडेसहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे.
ते म्हणाले, "तेव्हापासून आताच्या 3 मे पर्यंत एकदाही कर्फ्यू लागला नव्हता. मणिपूर एकही दिवस बंद नव्हतं, ना कधी नाकाबंदी होती. हा भारतीय जनता पक्षाचा सहा वर्षांचा इतिहास आहे."
त्या कलावतीसाठी तुम्ही काय केलं?
अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
त्यांनी म्हटलं, "या सदनात एक असा नेता आहे, ज्याला 13 वेळा राजकारणात लाँच करण्यात आलं आहे. एक लाँचिंग तर मी स्वतः पाहिलं आहे."
अमित शाह यांनी पुढे म्हटलं, ते (राहुल गांधी) कलावतीच्या घरी जेवण करण्यासाठी गेले. त्यांच्या गरीबीचं वर्णन केलं. त्यानंतर सहा वर्षं त्यांच्याच पक्षाचं सरकार होतं. कलावतीसाठी काय केलं?"
"कलावती यांना धान्य, गॅस, पाणी, शौचालय, जनधन, सगळं काही मोदी सरकारने दिलं आहे."
जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय.
ते म्हणाले की, जनतेचा आणि सदनाचा सरकारवर पूर्ण विश्वास आहे.
अमित शाह म्हणाले, "या अविश्वास प्रस्तावाचा उद्देश जनतेत संभ्रम निर्माण करणं एवढाच आहे. असा प्रस्ताव आणताना काही मुद्दे पुढे केले जातात. मात्र संभ्रम निर्माण करण्यासाठी हा अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे."
ते पुढे म्हणाले की, "ही जनतेची इच्छा नाहीये. जनतेला ही विश्वास आहे कारण, मोदी सरकारने देशातील 60 कोटी गरीब जनतेच्या जीवनातील आशा पूर्ण केल्या आहेत."
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतरचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अमित शहा म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर जनतेने ज्या सरकारवर, ज्या नेत्यावर सर्वाधिक विश्वास दाखवला असेल तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत."
ते म्हणाले, "कोणतीही सुट्टी न घेता 24 पैकी 17 तास काम करणारा कोणता नेता असेल तर ते पंतप्रधान मोदी आहेत. मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत 50 हून अधिक युगप्रवर्तक निर्णय घेतले. महात्मा गांधींनी देखील 9 ऑगस्ट रोजीच छोडो भारतची घोषणा दिली होती."
अमित शाह म्हणाले, "पंतप्रधानांनी देखील याच दिवशी भ्रष्टाचार क्विट इंडिया अशी घोषणा दिली."
मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या झाली- राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर भाषण करताना 'आज मै दिमाग से नही, दिल से बोलूंगा' असं म्हटलं.
खासदारकी बहाल झाल्यानंतरचं त्यांचं हे पहिलंच भाषण होतं. लोकसभेत पुन्हा घेतले म्ह्णून लोकसभा अध्यक्षांचे आभार मानले.
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर टीका करताना त्यांनी म्हटलं, "जो पर्यंत अहंकार आहे तोपर्यंत आपण लोकांचा आवाज आपण ऐकू शकत नाही. भारत एक आवाज आहे आणि या देशाचा आवाज ऐकावाच लागेल."
"मी मणिपूरमध्ये गेलो, पंतप्रधान गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी देशाचा भाग नाही. आज मणिपूर दोन भागात विभाजित झालाय."
"मणिपूरच्या कॅम्प मध्ये महिला नाही मुलांशी चर्चा केली . एका महिलेनं मला सांगितलं एकच मुलगा होता. माझ्या मुलाला माझ्या डोळ्यासमोर गोळी मारली, ती रात्रभर मुलाच्या मृतदेहापाशी बसली. त्याची आठवण म्हणून त्याचा एक फोटो आहे असं त्यांनी सांगितलं."
मी दुसऱ्या मणिपुरी महिलेला विचारला तुमच्यासोबत काय घडलं. त्या आठवणींनी ती महिला घाबरून बेशुद्ध पडली."
ही फक्त मणिपूरची नाही, तर भारत मातेची हत्या आहे, असंही राहुल गांधींनी म्हटलं.
राहुल गांधी संसदेत बोलताना संसद सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. केंद्रीय मंत्री किरेण रिजिजू यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले, "भारत मातेची हत्या या शब्दप्रयोगावरून राहुल गांधींनी माफी मागायला हवी."
'भारत जोडो' यात्रा संपलेली नाही - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मी 'भारत जोडो' यात्रेदरम्यान कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत प्रवास केला.
यावेळी दररोज 25 किलोमीटर चालणं आपल्यासाठी फार मोठी गोष्ट नाही, असं वाटायचं. कारण मी रोज 10 किलोमीटर चालतो आणि हा त्यांचा अहंकार होता.
"भारताने प्रत्येक अहंकार मिटवलाय. यात्रेदरम्यान दर दोन-तीन दिवसांनी माझा गुडघा दुखायचा. जेव्हा ही भीती (गुडघ्यांबद्दल) वाढायची तेव्हा माझ्यात कुठून ना कुठून शक्ती यायची. एके दिवशी एक लहान मुलगी आली आणि मला एक पत्र दिलं आणि ती म्हणू लागली की मी तुमच्या बरोबर चालते आहे, त्यामुळे मला बळ मिळालंय."
एका शेतकऱ्याचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, त्याचं दुखणं हे माझं दुखणं आहे.
"लोक म्हणतात की हा एक देश आहे, काहीजण म्हणतात की वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या बोली आहेत. हा देश फक्त एक आवाज आहे. हे वास्तव आहे. हा आवाज ऐकायचा असेल तर आपल्या हृदयातील अहंकार आणि स्वप्नांवर मात करावी लागेल."
स्मृती इराणी यांनी केले आरोप
स्मृती इराणी म्हणाल्या की, या सभागृहात भारत मातेच्या हत्येबद्दल बोलताना विरोधी आघाडीच्या 'इंडिया'च्या नेत्यांनी बाकं वाजवून समर्थन दिलं.
"मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. तो नेहमीच भारताचा भाग होता, आहे आणि राहील. आज देशाने पाहिलंय की, भारतमातेच्या हत्येची चर्चा सुरू असताना काँग्रेसने टाळ्या वाजवल्या."
भारत मातेच्या हत्येबद्दल बोलणारे बाकांवर बसून बाकं बडवत होते. भारताच्या इतिहासात आजपर्यंत असं घडलं नाही.
लोकसभेत स्मृती इराणी यांनी काश्मिरी पंडितांचाही मुद्दा उपस्थित केला.
स्मृती इराणी यांनी राजस्थानमधील भिलवाडा येथे 14 वर्षीय मुलीची हत्या आणि कथित सामूहिक बलात्काराचा मुद्दाही उपस्थित केला.
काँग्रेस खासदारांवर निशाणा साधत स्मृती म्हणाल्या की, तेव्हा त्यांच्या हृदयात धडकी भरली नाही का?
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सभागृहात राहुल गांधींवर आरोप करताना म्हणाल्या की, सभागृहाबाहेर जाताना राहुल गांधी यांनी चुकीचे हावभाव केले.
राहुल गांधी यांनी सभागृहात जे केलं ते अपमानास्पद असल्याचं इराणी म्हणाल्या.
भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आहे. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे म्हणाल्या, "एक सदस्य संसदेच्या आत फ्लाइंग किस देतोय. हे कसलं कृत्य आहे? यासंदर्भात सभापतींकडे तक्रार केली असून सीसीटीव्ही फुटेज घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे."
केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश म्हणाल्या की, "राहुल गांधींनी भाषण संपवलं आणि स्मृती इराणींनी भाषण सुरू केलं तेव्हा राहुल गांधींनी फ्लाइंग किस दिलं. कधी ते संसदेत डोळा मारतात तर कधी फ्लाइंग किस देतात. आमचा या कृतीला विरोध आहे. आम्ही महिला खासदारांनी सभापतींना यासंदर्भात पत्र दिलं आहे."
भाजप खासदार रवीशंकर प्रसाद यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, फ्लाइंग किस केलं...राहुल गांधींना नेमकं काय झालंय. त्यांना काही भान नाही. त्यांचं भाषणही काय होतं. भारत मातेची हत्या केली असं म्हटलं. राहुल गांधी, भारत माता अमर आहे.
त्याचवेळी, राहुल गांधींचं भाषण सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा यांनी ट्विट करत म्हटलंय, "संसदेतील देशवासीयांचा आवाज."
स्मृती इराणींना 'राहुल फोबिया'
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना 'राहुल फोबिया' असल्याचा आरोप काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी केला आहे.टागोर म्हणाले, "ही स्मृती इराणींची मोठी समस्या आहे. त्या राहुल फोबियामध्येच जगत असतात. राहुल गांधी जे पण काही बोलू, त्यावर इराणी नको ते बोलून जातात. त्यांनी हा फोबिया सोडला पाहिजे."लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाषण केलं.
त्यांनी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबियांवर जोरदार हल्ला चढवला.राहुल गांधी हे अनादराने वागल्याचा आरोपही इराणी यांनी यावेळी केला.यापूर्वी राहुल गांधी यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
आठ ऑगस्टच्या चर्चेत काय झालं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारविरोधात मंगळवारी विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव मांडला.
राष्ट्रवादी आणि INDIAच्या वतीने आपण अविश्वास ठरावाला पाठिंबा देत आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी चर्चेत सहभाग घेतला.
गेल्या 9 वर्षातील मोदी सरकारने काय काय केलं याचा पाढाच सुप्रिया सुळेंनी वाचून दाखवला. "गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारने 9 सरकारे पाडली आहेत. यात कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मेघालय, पाँडिचेरी, आणि महाराष्ट्रात दोनदा सरकार पाडले.""
याशिवाय मोदी सरकारच्या काळात महागाई, संस्थाचं खच्चीकरण, जागतिक पातळीवर भारताचे ढासळते निर्देशांक, संघराज्य पद्धतीवरील घाला आणि कायदा आणि सुव्यवस्था कोलमडलेली आहे," असंही सुळे म्हणाल्या. महागाईविषयी बोलताना सुळे म्हणाल्या, "केवळ टोमॅटोच नाही. कांदा, डाळ, आटा, मीठ, तांदूळ, तेल, चहा, दूध महाग झालं आहे. हेच UPAच्या काळात 500 रुपयात मिळायचं. आता हे सगळं घ्यायच म्हटलं तर एक हजार रुपयांहून अधिक पैसे मोजावे लागताहेत."
काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्तावावर चर्चा करताना पंतप्रधानांवर जोरदार हल्ला चढवला. "2002मध्ये गुजरातमध्ये दंगली झाल्या. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी गुजरातला गेले होते तिथल्या पीडितांचं सांत्वन केलं. पण आता मोदी देशाचे प्रमुख या नात्याने मणिपूरला जात नाहीत?" असा सवाल गौरव गोगोई यांनी विचारला. मणिपूर गेल्या 80 दिवसांपासून धगधगत आहे. तिथे राहुल गांधी यांनी भेट दिली, विरोधी पक्षाचे नेते गेले. पण मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी मौन बाळगण्याचे व्रत घेतलं आहे. ते मोडण्यासाठी आम्ही अविश्वास प्रस्ताव आणला आहे. असंही गोगोई म्हणाले.
मंगळवार (8 ऑगस्ट) आणि बुधवार (9 ऑगस्ट) असे दोन दिवस या अविश्वासाच्या ठरावावर चर्चा होईल. त्यानंतर नरेंद्र मोदी अविश्वास ठरावावर उत्तर देतील.
मोदी मणिपूरला का गेले नाहीत?- गौरव गोगोई
"देशाचे प्रमुख या नात्याने पंतप्रधानांनी सभागृहात यावे, बोलावे, शोक व्यक्त करावा आणि सगळ्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला दिला असता. जेणेकरून मणिपूरला संदेश गेला असता की आम्ही त्यांच्यासोबत आहोत. असा दुख:द क्षणी आपण देश म्हणून त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे, असं गोगोई यांनी पुढं म्हटलं.
मणिपूरवर बोलण्यासाठी पंतप्रधानांना 80 दिवस लागले. त्यानंतरही ते फक्त 30 सेकंद बोलले, अशीही गोगोई यांनी टीका केली.
2018 मध्येही असाच अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अनेक नेत्यांची भाषणं गाजली होती मात्र आता परिस्थितीत मोठा बदल झाला आहे.
ज्योतिरादित्य सिंदिया भाजपात जाऊन केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत.
गेल्या लोकसभेत 16 खासदार असणारा तेलगू देसम पक्ष आता 3 खासदारांवर आला आहे. गेल्या अविश्वास प्रस्तावाच्यावेळेस लोकसभेचे संचलन करणाऱ्या सुमित्रा महाजन आता निवडणुकांच्या राजकारणातून बाहेर पडल्या आहेत.
अविश्वास ठरावाबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे
जर अविश्वास ठरावाला 50 पेक्षा जास्त लोकसभा सदस्यांचा पाठिंबा असेल तर लोकसभाअध्यक्ष चर्चेची वेळ आणि तारीख ठरवतात.
लोकसभेचा कोणताही खासदार हा प्रस्ताव दाखल करू शकतो. त्याच्याकडे 50 सदस्यांचा पाठिंबा असला पाहिजे.
लोकसभेच्या नियम 198 नुसार ही नोटीस लिखित स्वरुपात सकाळी 10 वाजण्यापूर्वी अध्यक्षांकडे द्यावी लागते मग अध्यक्ष ती लोकसभेत वाचून दाखवतात.
नोटीस स्वीकारल्यावर 10 दिवसांच्या आत तारीख ठरवतात. जर सरकारने आपलं संख्याबळ दाखवू शकलं नाही तर सरकारला राजीनामा द्यावा लागतो.
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळातील हा दुसरा अविश्वासदर्शक ठराव आहे.
सध्या सत्ताधारी एनडीएकडे 325 खासदारांचे बळ आहे तर अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने फक्त 126 खासदार आहेत.
सत्ताधारी पक्षाकडे दोन्ही सभागृहांत बहुमत आहे. मात्र अविश्वासदर्शक प्रस्तावाला विरोधकांच्या एकतेच्या रुपात पाहिले जात आहे.