“राष्ट्रवादीचे ५४ पैकी ५३ आमदार शरद पवार यांच्यासोबत राहतील. अजित पवार एकटे पडतील. शरद पवारांच्या राजकीय वारसदाराचा प्रश्नही मिटला. सुप्रिया सुळे, आपले अभिनंदन!”, अशा आशयाचे खोचक ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे. शरद पवारांचे राजकीय वारसदार कोण, हा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला आहे. राज्यात अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर हाच धागा पकडून दिग्विजय सिंह यांनी ट्विटद्वारे चिमटा काढला आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये स्थापन होईल, असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा करत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये अजित पवार यांच्या विरोधात संतप्त वातावरण आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील पवार समर्थक आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार यांनी शरद पवार यांना दगा देत त्यांच्या पाठीत खंजीर खुपसले अशी टीका होत आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार आगपाखड केली. यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही फूट पडल्याचं चित्र असतनाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी हे ट्विट केले आहे.