ममता बॅनर्जींच्या महाराष्ट्र दौर्यानंतर राजकीय चर्चेला उधाण

बुधवार, 1 डिसेंबर 2021 (15:23 IST)
मुंबई : देशात सध्या भाजपला जोरदार टक्कर देणारे पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेकडे पाहिलं जात आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. अशावेळी युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि ममता बॅनर्जी यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बरोबर ममता बॅनर्जी यांना भेटलो. राजकारण व बंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा झाली.ममताजी आज सिध्दीविनायक मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी उद्धवजींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र -बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणारे नाहीत असे त्या म्हणाल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. त्यामुळे आगामी काळात भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन ममता बॅनर्जी मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
 
राजकीय चर्चा नाही : आदित्य ठाकरे
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. जेव्हाही मुंबईच्या दौऱ्यावर त्या येतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत असतो. आमच्यात एक वेगळे नाते आहे. आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीत औपचारिक चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
स्वाभाविक होतं की त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. तर मी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. मला स्वतःहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी पाठवले. मी शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यांनी एक शुभ संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलेला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती