ममता बॅनर्जींच्या शरद पवार आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीमागे काय कारण दडलंय?

बुधवार, 1 डिसेंबर 2021 (12:34 IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी उशीरा शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली, तर आज त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
 
ममता बॅनर्जींच्या या दोन्ही भेटी राजकीय वर्तुळात आधीच सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना बळ देणाऱ्या ठरतायेत.
 
पश्चिम बंगालमधील एकतर्फी विजयानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल पक्षाच्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
 
एकीकडे इतर पक्षातल्या दिग्गजांना तृणमूलमध्ये प्रवेश दिला जातोय, तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या बाहेर पडत इतर राज्यात स्वबळावर निवडणुकीत उतरण्यासही तृणमूलनं सुरुवात केलीय.
 
या दोन्ही गोष्टींसाठी गोवा ताजं उदाहरण. काँग्रेसचे नेते आणि गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यालाच पक्षात घेत तिथल्या आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनं तृणमूल उतरताना दिसतेय.
 
आधी पश्चिम बंगालपुरतं मर्यादित मानल्या गेलेल्या ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच, राज्याबाहेरील राजकीय हालचाली वाढवल्या आहेत.
 
ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या या वाढत्या राजकीय हालचालींचा अर्थ काय? ममता बॅनर्जी काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीच्या बांधणीसाठी जमवाजमव करतायेत का? त्यांच्या ठाकरे आणि पवार यांच्या भेटी घेण्यामागे काय कारणं आहेत? या प्रश्नाचं उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
 
तत्पूर्वी, गेल्या काही दिवसात तृणमूलमध्ये कुठल्या प्रमुख नेत्यांनी प्रवेश केला आहे, यावर एक नजर टाकूया.
 
तृणमूल काँग्रेसमधील पक्षप्रवेश अचानक का वाढले?
गेल्या काही दिवसात तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या अचानकपणे वाढलेली दिसते. त्यातही काँग्रेसमधून तृणमूलमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.
 
ज्येष्ठ काँग्रेस नेते असलेले संतोष मोहन देव यांची मुलगी आणि काँग्रेस नेत्या सुष्मिता देव यांनी ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलनं त्यांना राज्यसभेतही पाठवलं.
 
त्यानंतर कीर्ती आझाद असो किंवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले कमलापती त्रिपाठी यांचे नातू राजेश त्रिपाठी असो, असे एकामागोमाग एक नेते काँग्रेसमधून तृणमूलमध्ये प्रवेश करताना दिसतायेत.
 
मेघालयमध्ये तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते मुकुल संगमा यांच्यासह 12 काँग्रेस आमदारांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. तिथं काँग्रेसचे एकूण 18 आमदार होते. त्यामुळे काँग्रेसऐवजी आता तृणमूल तिथं मुख्य विरोधी पक्ष बनलाय.
 
हरियाणाचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांचाही तृणमूलचा झेंडा हाती घेतलेल्या नेत्यांच्या नावामध्ये समावेश आहे.
 
केवळ काँग्रेसच नव्हे, तर इतर पक्षांमधील नेत्यांनीही तृणमूलमध्ये प्रवेश केलाय. भाजपचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, जनता दल (यूनायटेड) चे नेते आणि माजी मंत्री पवन वर्मा यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा तृणमूलमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
 
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत तर तृणमूल काँग्रेस पूर्ण ताकदीनं उतरताना दिसतेय. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईझिनो फालेरो यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूलनं त्यांना राज्यसभेतही पाठवलं आहे.
 
भाजपचा गड असलेला आणि काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद असलेल्या गोव्यात तृणमूल काँग्रेसनं इतकी ताकद लावल्यानं काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीच्या दिशेनं तृणमूल पावलं टाकत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
 
तत्पूर्वी, महत्वाचा प्रश्न म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय राजकारणात यायचं आहे का? त्यावर आम्ही पश्चिम बंगालमधील राजकीय विश्लेषकांशी चर्चा केली.
 
ममता बॅनर्जांना राष्ट्रीय राजकारणात यायचंय का?
तृणमूल कांग्रेस आणि विशेषतः ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं देशातील इतर राज्यांमध्ये पाय पसरण्याची घाई करत आहेत, त्यावरून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे जाणवत आहेत, असं अभ्यासकांचं मत आहे.
 
कोलकात्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक निर्माल्य मुखर्जी यांच्या मते, "ममता बॅनर्जी सध्या जे करत आहेत, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलं होतं. सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनल्यानंतर मोदींची महत्त्वाकांक्षा जागृत झाली आणि त्यांनी प्रादेशिक राजकारणातून राष्ट्रीय राजकारणाकडे मोर्चा वळवला."
 
"ममता बॅनर्जीदेखील सध्या मोठ्या विजयाच्या यशावर स्वार आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःला पश्चिम बंगालपर्यंत मर्यादित ठेवायचं नाहीये. पश्चिम बंगालमध्ये जे मिळवायचं होतं, ते त्यांनी मिळवलं आहे," असं निर्माल्य मुखर्जी म्हणाले.
 
असं विश्लेषण पश्चिम बंगालमधील पत्रकार करत असतानाच, पण या विश्लेषणाला बळ देणाऱ्या राजकीय घडामोडी तृणमूलच्या गोटात घडताना दिसतायेत.
 
ममता बॅनर्जी मंगळवारपासून (29 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या भेटीनंतर त्या आज (30 नोव्हेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहेत.
 
ममता महाराष्ट्रातून कुणाला आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न करतायेत का आणि सर्वांत मूळ प्रश्न म्हणजे, या सर्व गाठीभेटी म्हणजे तिसऱ्या आघाडीची जमवाजमव आहे का?
ममतांची पवारांसोबत भेट म्हणजे तिसऱ्या आघाडीची जमवाजमव?
याबाबत एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक मनोरंजन भारती म्हणतात, "पश्चिम बंगाल जिंकल्यानंतर ममता बॅनर्जी यांना असं वाटतंय की, देशात काँग्रेसची असलेली जागा (स्पेस) आपल्याला मिळावी. मात्र, त्यासाठी त्यांना आधी राष्ट्रीय पक्ष बनावं लागेल. त्यासाठी निवडणूक आयोगाचे काही निकष आहेत. हे निकष पूर्ण करण्यासाठी ममता बॅनर्जी सध्या प्रयत्न करताना दिसतायेत."
 
"पश्चिम बंगालबाहेर त्रिपुरा, गोवा, मेघालयकडे ममता बॅनर्जी यांची नजर आहे. या छोट्या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेसला एकदा यश मिळाल्यानंतर त्या राष्ट्रीय स्तरावर स्वत:ला आणतील," असं मनोरंजन भारती म्हणतात.
 
मात्र, मनोरंजन भारती इथं ममता बॅनर्जी यांच्या राष्ट्रीय स्तरावरील स्वीकाराबाबत (अॅक्सेप्टन्स) भाष्य करतात.
 
भारती म्हणतात, "ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला ज्या पद्धतीने पराभूत केलं आहे, ते पाहता त्यांना वाटत असावं की सर्व पक्षांनी आपलं समर्थन करावं. पण राष्ट्रीय स्तरावर त्यांना आणखी स्पर्धक आहेत.
 
"जोपर्यंत शरद पवार आहेत, तोवर तुलनेने पवारांवर सहमती बनवणं अनेकांना अधिक सोयीचं आहे. त्यात पवारांसारख्या नेत्यांना दिल्लीचा अनुभव जास्त आहे. शिवाय, शरद पवार जसे शातं डोक्यानं विचार करून निर्णय घेतात, तसे निर्णय ममता घेत नाहीत. त्या आक्रमक आहेत."
 
गेल्या काही दिवसात ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालबाहेरील अनेक नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश दिलाय आणि त्यातल्या काहींना थेट राज्यसभेतही पाठवलं आहे.
 
यावर मनोरंजन भारती म्हणतात, "मुद्दा असा आहे की, ममता बॅनर्जी यांनी अशा लोकांना गेल्या काही दिवसात पक्षात घेतलंय, जे स्वत:च बाजूला पडले होते. किर्ती आझाद, पवन वर्मा किंवा गोव्याचे माजी मुख्यमंत्री फलेरो हे नेते स्वत:च्या ताकदीवर जिंकू शकत नाहीत. मग या लोकांना घेऊन तृणमूल काय करणार आहेत? हरियाणातील अशोक तन्वर हा त्यातल्या त्यात चांगला नेता तृणमूलच्या हाती लागला आहे."
 
मात्र, दिल्लीस्थित पत्रकार महेश सरलष्कर तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीबाबतच शंका उपस्थित करतात.
 
ते म्हणतात, "तिसरी आघाडी वगैरे असं काही होईल असं दिसत नाही. पण ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला धूळ चारली. भाजपविरोधात तृणमूलसारखा पक्ष उभा राहू शकतो आणि त्यांना पराभूत करण्याचं धाडस दाखवू शकतो, हे तृणमूलनं दाखवलं. त्यामुळे सहाजिकच ममता बॅनर्जी यांसारख्या नेत्याच्या महत्वकांक्षा वाढणं हा राजकीय भाग झाला. पण हा वैयक्तिक राजकीय भाग. याला राष्ट्रीय राजकारणात फार महत्त्व देण्याची गरज नाही."
 
"मग ममता बॅनर्जी यांच्या वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षेचा भाग बाजूला केला, तर बाकी तिसरी आघाडी वगैरे गोष्टी गैरलागू ठरतात," असं सरलष्कर म्हणतात.
 
शिवाय, "आता लगेच भाजपविरोधात काही मोट बांधावी अशी स्थिती निर्माण झालेली नाही. विरोधकांची महाआघाडी होताना आता तरी दिसत नाही. लोकसभेच्या निवडणुकीला तीन वर्षं बाकी आहेत. प्रादेशिक पातळीवर जो ताकदवान असेल त्याला पाठिंबा द्यायचा, या फॉर्म्युल्याची चाचपणी होऊ शकते आणि हे शक्य झालं तर ती भाजपविरोधातली लढाई ठरू शकेल," असंही महेश सरलष्कर यांना वाटतं.
 
पण जरी तिसऱ्या आघाडीसाठी ममता बॅनर्जी प्रयत्न करत असतील, तरी त्या काँग्रेसला का बाजूला सारत आहेत? तसंच, काँग्रेसला बाजूला ठेवून आघाडी शक्य आहे का?
काँग्रेसला वगळून आघाडी शक्य आहे का?
ज्या शरद पवारांची भेट बुधवारी (१ डिसेंबर) ममता बॅनर्जी घेणार आहेत, त्यांच्या पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत म्हटलं की,
 
"विरोधकांची मोट कशी बांधता येईल, यावर शरद पवारांनी वारंवार भाष्य केलं आहे. आमच्या पक्षाची भूमिका आहे की, सर्व विरोध एकत्र आले पाहिजेत. मात्र, काँग्रेसशिवाय विरोधकांची आघाडी होऊ शकत नाही, अशीही भूमिका पवारांनी मांडली आहे."
 
"मेघालयमध्ये काही आमदार काँग्रेससोबत राहू इच्छित नव्हते, ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. किंवा तृणमूलच्या विस्तार भूमिकेमुळे ते तसं करतायेत. प्रत्येक पक्षाला पक्षबांधणी करण्याचा अधिकार असतो.
 
पण राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे की, विरोधकांची मोट बांधली पाहिजे. जर शिवसेना काँग्रेससोबत येऊ शकते, तर काँग्रेस आणि तृणमूल तर एका विचारधारेचे पक्ष आहेत. काही मतभेद असतील तर ते दूर करू," असंही नवाब मलिक म्हणाले.
 
एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपदाक मनोरंजन भारतीही मलिक यांच्या भूमिकेला दुजोरा देतात.
 
"आजच्या घडीला काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी भारतात बनू शकत नाही. कारण आजही काँग्रेस देशभर विस्तारलेला पक्ष आहे आणि देशभरात काँग्रेसचा वावर (प्रेझेन्स) आहे. हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळेच शरद पवारांसारखे नेते सुद्धा मान्य करतात की, काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी शक्य नाही. मात्र, ममता बॅनर्जी यांना वाटतं की, काँग्रेसशिवाय आघाडी शक्य आहे. पण वास्तवात ते शक्य नाही." असं मनोरंजन भारती म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती