Jio, Airtel आणि Idea-Vodafone ने आपले प्रीपेड दर का वाढवले?

मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (08:54 IST)
ऋजुता लुकतुके
तुम्ही जर प्रीपेड मोबाईल सेवा वापरत असाल तर अलीकडे या सेवेच्या दरांमध्ये झालेला बदल तुम्हाला एव्हाना माहीत झाला असेल.
एअरटेल, जिओ आणि आयडिया-व्होडाफोन या तीनही प्रमुख टेलिफोन सेवा देणाऱ्या कंपन्यांनी आपले प्रीपेड सेवेसाठीचे दर जवळजवळ 19% ते 25% नी वाढवले आहेत. एक डिसेंबरपासून हे नवे दर लागू होतील.
जिओनं आपला 28 दिवसांसाठी असलेला प्राथमिक प्लान आधीसारखाच 91 रुपये इतका ठेवला आहे. तर एअरटेलने हा प्लानही बदलून 28 दिवसांसाठी 99 रुपये इतका केला आहे.
येत्या काही दिवसांमध्ये आयडिया-व्होडाफोन कंपनीही आपले नवे दर लागू करण्याची शक्यता आहे.
टेलिकॉम क्षेत्रात या नवीन प्रीपेड दरांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे लोकांमध्ये प्रश्न आहेत की हे दर का वाढले?
प्री-पेड नंतर पोस्ट पेड सेवेवरही याचा परिणाम होणार का? आणि ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सेवेत याचा काय परिणाम होईल. या सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊया…
 
प्री-पेड मोबाईल दर का वाढले?
भारतात मोबाईल प्राईस-वॉर म्हणजेच स्वस्त मोबाईल आणि इंटरनेट सेवा देण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये मागचे पाच वर्षं एक अघोषित युद्ध सुरू होतं.
कारण, रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि आयडिया व्होडाफोन या कंपन्यांमध्ये ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सुरू असलेली जोरदार स्पर्धा.
 
2016मध्ये रिलायन्स जिओचं या स्पर्धेत आगमन झालं होतं. आणि तिथून ग्राहकांना अतिरिक्त सुविधा, स्वस्त हँडसेट आणि इतर सवलती देण्याची स्पर्धा प्रचंड वाढली.
पण, यात भारतीय ग्राहकांचा फायदा होत होता तसंच माहिती-तंत्रज्ञान सेवा देऊ करणाऱ्या कंपन्यांचाही. त्यांचा उद्योगही वाढत होता.
पण, असा स्वस्त टॉकटाईम आणि डेटा ग्राहकांना देण्याच्या नादात या टेलिकॉम कंपन्यांचं मात्र नुकसान होत होतं. टेलिकॉम क्षेत्रात 'अॅव्हरेज रेव्हेन्यू पर युजर' या संकल्पनेला महत्त्व आहे.
दर ग्राहकामागे कंपनीला मिळणारा महसूल. हा आकडा कंपनीची कामगिरी आणि नफा कमावण्याची क्षमता समजून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. अलीकडच्या प्राईस वॉरमुळे तीनही प्रमुख भारतीय कंपन्यांचा हा दर दोनशेच्याही खाली गेला होता.
याचा थेट अर्थ कंपन्यांचा नफा दिवसेंदिवस कमी होत होता. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे हा दर साधारणत: 300च्या आसपास असतो.
दर वाढले तर टेलिकॉम कंपन्यांचा महसूल वाढेल आणि चांगलं नेटवर्क, ते वाढवण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा तसंच आगामी 5-जी सेवा ग्राहकांना देण्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक यासाठी हा पैसा टेलिकॉम कंपन्या वापरू शकतील.
त्यामुळे वाढील दरांचा बोजा ग्राहकांवर पडणार असला तरी कदाचित आतापेक्षा चांगली सेवा मिळू शकेल.
एअरटेल कंपनीने मागच्या आठवड्यात दरवाढीची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली होती ती त्याचसाठी.
 
प्री-पेडनंतर पोस्ट-पेडही महागणार का?
प्री-पेडच्या तुलनेत पोस्ट पेडचा ग्राहक हा कंपनीचा दीर्घकालीन ग्राहक असतो. तो महिन्याच्या महिन्याला बिल भरत असल्याने कंपनीशी बांधलेला असतो. त्यामुळे सहसा कुठलीही दरवाढ आधी प्री-पेडमध्ये आणि मग काही कालावधीनंतर पोस्ट पेडमध्ये होते.
उलट नवीन ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी प्री-पेड सेवा हे माध्यम असल्यामुळे कंपन्यांचा कलही आधी ग्राहकांना प्री-पेड सेवा घ्यायला लावायची आणि मग ती पोस्ट-पेडमध्ये परिवर्तित करण्यासाठी नवं अमीष दाखवायचं असा असतो.
सध्या पोस्ट पेड सेवा घेण्यासाठीही ग्राहकांना नवनवीन योजना टेलिकॉम कंपन्यांकडून सादर केल्या जात आहेत. आणि तज्ज्ञांच्या मते पोस्ट पेड सेवांवरील या सुविधा सुरूच राहतील. पण, हळू हळू पोस्ट पेड सेवाही महागतील. वर्षभरानंतर पोस्ट पेड सेवांमध्येही फरक पडू शकेल.
 
दरवाढीचा ग्राहकांवर काय परिणाम होईल?
सध्यातरी ग्राहकांवर प्री-पेड सेवेसाठी 19 ते 25% टक्के दरवाढीचा बोजा बसणार आहे. पण, वर सांगितल्या प्रमाणे ही दरवाढ म्हणजे टेलिकॉम क्षेत्रात सुरू असलेलं प्राईस वॉर संपत असल्याची अनधिकृत घोषणा आहे. इथून पुढे मोबाईल सेवा दरांचा आलेख हा चढता असणार आहे.
पण, त्या बदल्यात सेवा आणि सेवांचा दर्जा सुधारू शकतो. म्हणजे कंपनीने ग्राहकांकडून आकारलेला अतिरिक्त दर कंपनीचा महसूल वाढवणारा असेल.
 
आणि हा पैसा कंपनी सेवांचं विस्तारीकरण, चांगली सेवा, चांगलं फायबर नेटवर्क आणि 5जी सेवेसाठी वापरू शकेल. तसं झालं तर कॉल ड्रॉप, अस्पष्ट आवाज, इंटरनेटची अनुपलब्धता या बाबतीत चांगली सेवा कंपन्या देऊ शकतील.
आताच्या घडीला आयडिया-व्होडाफोन ही कंपनी कर्जाच्या विळख्यात आहे. तर भारती एअरटेल कंपनीही रोख पैशासाठी झगडतेय. अशावेळी या कंपन्यांच्या वार्षिक ताळेबंदात खूपच फरक पडणार आहे.
 
Amzon Prime आणि DTH रीचार्जही महाग
14 डिसेंबरपासून अॅमेझॉनच्या प्राईम मेंबरशिपसाठीचे दरही महागणार आहेत. या सबस्क्रिप्शनमध्ये 50 टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. अॅमेझॉन प्राईमचं वार्षिक सबस्क्रिप्शन आता रु.1,499 तर तीन महिन्यांचा प्लान रु.459 ला मिळेल. मासिक प्लानची फी 129 रुपयांवरून वाढवून 179 रुपये करण्यात आली आहे.
यासोबतच 1 डिसेंबरपासून देशातल्या काही वाहिन्यांच्या किंमती वाढणार आहेत. परिणामी DTH रीचार्जही महाग होईल. स्टार प्लस, सोनी, कर्लस, झी समूहाच्या वाहिन्यांचे दर वाढवण्यात आलेले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती