Omicron व्हेरियंट, कोरोना लस आणि लॉकडाऊनबद्दलचे 5 प्रश्न आणि त्यांची उत्तरं

मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (08:44 IST)
- सिद्धनाथ गानू
ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा म्युटेशन, लशींची उपयुक्तता, बूस्टर डोस आणि सर्वांचा नावडता 'लॉकडाऊन' या सगळ्यांची चर्चा सुरू झाली आहे. शास्त्रज्ञांनी याचं वर्णन 'भयंकर', 'भयावह' अशा शब्दांमध्ये केल्यामुळे तिसऱ्या लाटेच्या चर्चांनीही जोर धरला.
 
कोरोना व्हायरसचा नवीन अवतार ओमिक्रॉन, कोरोनाप्रतिबंधक लशी, तिसरी लाट आणि लॉकडाऊनबद्दल तुम्हाला मनात असलेल्या शंका आणि प्रश्नांची उत्तरं आपण शोधू या.
 
पण त्यापूर्वी एक आठवण, प्रत्येक व्हायरस म्युटेट होत असतो, काही म्युटेशन्स (उत्परिवर्तनं) व्हायरसला आणखी ताकद देतात, काही त्याला कमकुवत करतात.
 
वुहानमध्ये नोव्हेंबर 2019 मध्ये पहिल्यांदा सापडलेल्या नॉव्हेल कोरोनाव्हायरसपासून आतापर्यंत SARS-COV-2 ची अनेक म्युटेशन्स झाली. यातलं सर्वांत नवीन म्हणजे ओमिक्रॉन.
 
1. ओमिक्रॉन सर्वांत भयंकर का?
कोरोनाच्या म्युटेशन्सचं दोन गटांत वर्गीकरण केलेलं आहे. जे काळजी करण्यासारखे आहेत त्यांना व्हेरियंट ऑफ कन्सर्न (VOC) म्हणतात. काही लक्ष ठेवण्यासारखे आहेत ज्यांना व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट (VOI) म्हणतात.
 
व्हेरियंट ऑफ कन्सर्नमधला पाचवा आणि सगळ्यांत नवीन व्हेरियंट म्हणजे ओमिक्रॉन. त्याला नाव देताना WHO ने 'न्यू' आणि 'शी' ही दोन अक्षरं गाळली. ज्यावरून सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क सुरू आहेत.
 
ओमिक्रॉनमध्ये 50 म्युटेशन्स आहेत. यातली 32 ही त्याच्या खिळ्यांवर म्हणजे स्पाईक प्रोटीनवर आहेत. 10 म्युटेशन्स त्याच्या त्या भागांवर आहेत जो आपल्या पेशींशी थेट संपर्क करतो. याला 'रिसेप्टर बाईंडिंग डोमेन' असं म्हणतात.
 
आणखीही काही म्युटेशन्स इतरत्र आहेत. जगात सर्वाधिक पसरलेला आणि ज्याला आपण सगळ्यात गंभीर मानत होतो त्या डेल्टा व्हेरियंटच्या याच भागात फक्त 2 म्युटेशन्स होती. त्यामुळे ओमिक्रॉन जास्त संसर्गक्षम आहे अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे.
 
2. ओमिक्रॉनवर लशी काम करणार का?
कोरोनावरच्या बहुतांश लशी या स्पाईक प्रोटीनवर आधारलेल्या आहेत. म्हणजे त्यांना कोरोनाचं स्पाईक प्रोटीन ओळखायला शिकवलंय. ते शरीरात सापडलं की त्या त्यावर हल्ला चढवतात.
 
पण ओमिक्रॉनच्या या स्पाईक्समध्येच 30 म्युटेशन्स झाली आहेत त्यामुळे सध्याच्या लशी त्यावर काम करू शकतील का? ओमिक्रॉनवर काम करण्यासाठी नवीन लशी बनवाव्या लागतील का असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत.
 
महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी बीबीसी मराठीशी याबद्दल बोलताना म्हटलं, "कोव्हिडची पुढची दिशा 'मल्टिव्हेलंट व्हॅक्सीन' (म्हणजे एका विषाणूच्या अनेक रुपांवर काम करू शकणाऱ्या लशी) निर्माण करण्याकडे रहाणार आहे.
 
"लशीमुळे शरीरात असलेल्या मेमरी टी सेल्सच्या स्मरणशक्तीत व्हायरसचे गुणधर्म रहातात. त्यामुळे त्या त्यांचा प्रतिकार करण्यास लक्षम होतात. लस घेतल्यामुळे कोरोना होत नाही असं नाही. पण, संसर्ग झालाच तर तो अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. लस किती प्रभावी आहे यात आपण जायला नको. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे," ओक सांगतात.
 
ज्या दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनच्या सर्वाधिक केसेस सापडल्या आहेत तिथे फक्त 24 टक्के लोकांचंच लसीकरण पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला की व्हायरसला पसरायला आणि पुढे म्युटेट व्हायला कसा वाव मिळतो याकडे यामुळे लक्ष वेधलं गेलं आहे.
 
3. ओमिक्रॉन कुठे-कुठे पसरला आहे?
ओमिक्रॉनचा उदय आणि सुरुवातीचा प्रसार आफ्रिकेत झालेला दिसतोय. याची माहिती सर्वांत आधी दक्षिण आफ्रिकेने WHO ला दिली. द. आफ्रिकेच्या गाउटेंग प्रांतातल्या जवळपास 90 टक्के केसेस याच व्हेरियंटच्या असू शकतात असा एक अंदाज आहे.
 
आफ्रिकेत बोत्सवाना, नामिबिया, लेसोथो, झिम्बाब्वे या देशांमध्येही या केसेस सापडल्या आहेत. युरोपात युके, बेल्जियम, जर्मनी, चेक रिपब्लिक, इटली नेदरलँड्समध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत.
 
याशिवाय ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हाँग काँग, इस्रायल याठिकाणीही याच्या केसेस सापडल्या आहेत. जगातल्या अनेक देशांनी आफ्रिकेतून प्रवास करण्यावर निर्बंध घातलेत. दक्षिण आफ्रिकेने यावर आक्षेप घेत त्यांनी शास्त्रीय माहिती वेळेत दिल्याबद्दल त्यांना शिक्षा केली जाते आहे अशी तक्रार केली आहे.
 
4. तिसरी लाट आणि लॉकडाऊन टाळण्यासाठी तयारी आहे?
ओमिक्रॉनमुळे पुढची लाट येईल असा तर्क काढणं हे अत्यंत घाईचं ठरेल असं तज्ज्ञ सांगतात. पण पुढच्या लाटेसाठी भारत तयार आहे का याचं उत्तर आपण शोधू शकतो.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा, 'कुछ नही होता यार' हे अजिबात चालणार नाही असा थेट इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनीही लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.
 
लॉकडाऊनचा एक प्रमुख उपयोग लोकांची हालचाल मर्यादित करून संसर्गाची शक्यता कमी करणं हा जसा होता तसंच आरोग्य यंत्रणा आणि त्यासाठीच्या सोयीसुविधा उभ्या करणं हादेखिल होता. हे दुसरं उद्दिष्ट साध्य करण्यात किती यश आलं आहे?
 
2017 साली राष्ट्रीय आरोग्य धोरणात भारत सरकारने GDP च्या 2.5 टक्के खर्च आरोग्यावर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण 2022 चं आर्थिक वर्ष संपेपर्यंत हा खर्च जेमतेम 1.3 टक्क्याला भिडलेला असेल.
 
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहाण्यासाठी प्रख्यात साथरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांनी या 5 उपाययोजना सुचवल्या आहेत.
 
1. स्वतंत्र तज्ज्ञ समितीकडून भारताच्या कोव्हिडविरोधी मोहिमेचं निष्पक्ष मूल्यमापन
 
2. गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांनी आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता
 
3. पॅनिक आणि चुकीच्या माहितीचा प्रसार टाळण्यासाठी निर्णयकर्ते आणि तज्ज्ञांना लोकांपर्यंत शास्त्रीय माहिती पोहोचवण्याचं प्रशिक्षण
 
4. प्राथमिक आरोग्य व्यवस्थेशी कोव्हिड उपाययोजनांची सांगड
 
5. आरोग्य यंत्रणेतल्या रिकाम्या जागा भरून सगळीकडे यथायोग्य मनुष्यबळाची खातरजमा
 
पण ओमिक्रॉनच्या भीतीने बूस्टर डोस, लशीच्या दोन डोसमधे असलेलं अंतर तसंच शाळा उघडण्यासंबंधी घाईघाईने निर्णय घेतले जाऊ नयेत असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
5. ओमिक्रॉन आला, आता मी काय करू?
नवे व्हेरियंट आले की दोन प्रकारच्या प्रतिक्रीया सर्रास पाहायला मिळतात. एक असते घाबरून 'बाप रे, आता मी काय करू?' आणि दुसरी बेफिकीरीची 'बरं, मग मी काय करू?' कोणतंही टोक गाठण्यात नुकसान आपलंच आहे.
 
नवा व्हेरियंट नेमका किती धोकादायक आहे हे कळायला अजून थोडा वेळ लागेल. त्यानंतर आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ कदाचित नवीन सूचना देतील. डॉ. संजय ओक याबद्दल म्हणतात, "मास्क वापरावं, लस नक्की घ्यावी आणि सोशल डिस्टंसिंग पाळावं ही माझी लोकांना हात जोडून विनंती आहे."
 
डॉक्टर, लस, औषधं या सगळ्यांचं काम व्हायरस शरीरात शिरल्यानंतरचं आहे. तो शिरू नये म्हणून करण्याच्या गोष्टी आपल्या हातात आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती