Omicron व्हेरिएंट : लॉकडाऊन परतून येईल का?

मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (08:26 IST)
मयुरेश कोण्णूर
दक्षिण आफ्रिकेत आढळेल्या 'ओमिक्रॉन' या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारानं जग धास्तावलं आहे. आफ्रिकन देशांतून येणा-या प्रवाशांना अनेक देशांची दारं बंद होत आहेत. शिवाय अधिक संसर्गजन्य असण्याच्या शक्यतेतून जग पुन्हा एकदा निर्बंधांच्या मार्गावर आहे.
भारत आणि महाराष्ट्र गेल्या थोडक्या काळापासून दुस-या लाटेतून सावरत पुन्हा सगळे निर्बंध मागे घेऊन मोकळा श्वास घेत होते. राज्यात तर 1 डिसेंबरपासून पुन्हा शाळा सुरु करण्याची घोषणा ही सगळ्या बंधनांचा शेवट म्हणून बघितली जात होती. पण तेवढ्यात ओमिक्रॉनच्या जन्मानं देश आणि राज्याला सावध पवित्र्यात मागे ढकललं आहे.
दिल्लीत आणि मुंबईत टास्क फोर्सच्या तातडीच्या बैठका होत आहेत. दिल्लीत आंतराष्ट्रीय हवाई सीमा पूर्ण खुल्या करण्याच्या निर्णयाचा फेरविचार सुरू आहे तर शाळा मात्र सुरू होणार असल्याचं राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.
ही बातमी लिहित असेपर्यंत भारतात अद्याप ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलेला नाही आणि अद्याप या व्हेरिएंटबद्दल, त्याच्या गंभीर परिणामांबद्दल, त्यावरच्या लशीच्या परिणामांबद्दल अजून बरीच माहिती अभ्यासानंतर प्रकाशात यायची आहे.
पण युरोप-चीनसह जगातल्या अनेक देशांमध्ये लावले जात असणारे निर्बंध आणि भारतीय राज्य सरकारांना तातडीनं घेतली बचावात्मक भूमिका हे पाहता, हा रस्ता पुन्हा लॉकडाऊनकडे जाऊ शकतो. पहिल्या लाटेनंतर झालेलं आर्थिक नुकसात पाहता दुसरी लाट अधिक गंभीर असतांनाही केंद्र सरकारनं लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला. लॉकडाऊनच्या धक्क्यांतून अनेक क्षेत्रं अद्याप बाहेर यायची आहे. असं असतांना ओमिक्रॉनच्या छायेमध्ये पहिला प्रश्न प्रत्येकाला पडतो आहे तो म्हणजे, परत लॉकडाऊनची शक्यता आहे का? आणि जर लॉकडाऊन किंवा निर्बंधांची स्थिती आली तर ती आता परवडण्यासारखी आहे का?
 
जगभरातल्या देशांची तीव्र प्रतिक्रिया
ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंटची काळजी जगभर पसरण्याअगोदरच युरोपसह जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे पाहून पुन्हा निर्बंध लावण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. जेव्हा भारत लॉकडाऊनमधून टप्प्याटप्प्यानं बाहेर पडत शेवटाशी पोहोचला होता, तेव्हा महत्त्वाचे देश पुन्हा निर्बंधांकडे जायला लागले होते. युरोपातल्या देशांची संख्या त्यात अधिक आहे.
नेदरलँड, ऑस्ट्रिया, पोर्तुगाल, चेकोस्लोव्हाकिया अशा देशांमध्ये कमी अधिक प्रमाणात निर्बंध परतले. जर्मनी, युके, फ्रान्स, इटली या देशांमध्येही गंभीर निर्णय घेण्याची शक्यता बोलून दाखवली जाते आहे. चीनच्याही काही भागांमध्ये निर्बंध परतले आहेत.
अर्थात कोरोनाकाळाच्या सुरुवातीला ज्या प्रकारचा लॉकडाऊन जगभरानं अनुभवला आणि त्याचे आर्थिक परिणाम भोगले, त्यानंतर आता येणा-या निर्बंधांना अनेक ठिकाणी विरोध होतो आहे. काही सरकारांनी लसीकरणासाठी नियम कडक केल्यावरही त्याला मोठा विरोध झाला.
आता ओमिक्रॉन अवतरल्यानंतर जगभरातल्या सगळ्या महत्वाच्या देशांनी अनेक आफ्रिकन देशांतून येणा-या प्रवाशांना दारं बंद केली आहेत. या देशांसोबत असलेल्या प्रवास बंद केला आहे. जेव्हा कोरोनाकाळ सुरु झाला तेव्हा पूर्ण लॉकडाऊनकडे जाण्याअगोदर अशाच प्रकारची पावलं उचलली होती. त्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा या कल्पनेनं आला की आपण अजून एका लॉकडाऊनकडे तर चाललो नाही आहे ना?
 
भारत आणि महाराष्ट्र काय करेल?
अजूनही भारतानं इतर देशांप्रमाणे आफ्रिकेतल्या देशांच्या हवाई वाहतुकीवर पूर्ण बंदी घातली नाही आहे, पण स्क्रिनिंग आणि क्वारंटाईन हे मात्र अधिक कडक केलं गेलं आहे. नुकतेच भारतात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी असलेले थोडेफार निर्बंधही पूर्णपणे उठत होते. तेवढ्यात नवा व्हेरिएंट समोर आला. लॉकडाऊनला, विशेषत: दुस-या लाटेदरम्यान, झालेला विरोध पाहता भारतात, केंद्र सरकारनं हा निर्णय राज्य सरकारांकडेच सोपवला आहे. पण आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम पाहता आणि संसर्गाचीही स्थिती पाहता, तो सध्या तरी पर्याय नाही आहे.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारची भूमिका निर्बंधांना कितीही विरोध झाला तरी सुरक्षेसाठी ते आवश्यक तेवढे ठेवण्याची आहे. सरकारमधल्या काही पक्षांनी विरोध केला तरी सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला होता. पण आता महाराष्ट्र जवळपास संपूर्ण खुला झाला आहे. शाळा सुरु होताहेत, स्टेडियममध्ये प्रेक्षक येणार आहेत आणि नाट्यगृहंही पूर्ण क्षमतेनं सुरु होत आहेत.
राज्य सरकार तातडीनं सावध झालं आहे. कोविड जम्बो सेंटर्सची तयारी सुरु झाली आहे. पण अजून सरकार या टप्प्यावर लॉकडाऊनचा वा निर्बंधांचा विचार करत नाही आहे असं दिसतंय. शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे त्यावरुन हे स्पष्ट आहे.
ओमिक्रॉनसंदर्भात झालेल्या बैठकीत लॉकडाऊन हा शब्द कोणी उच्चारलाही नाही असं महाराष्ट्राच्या कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
"लॉकडाऊन आणि नियंत्रण याला वैद्यकीय परिभाषेत थेट उत्तर नाही. डॉक्टर भलेही 100 टक्के लॉकडाऊनची अपेक्षा करत असतील. पण व्यावसायिक आणि आर्थिक गणितांचा विचार करता शक्य होणार नाही. ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत दोन दिवस झालेल्या बैठकीत कोणीही लॉकडाऊन शब्द उच्चारला नाही. लॉकडाऊनचे चटके सर्वांनी सोसलेत, दुष्परिणाम पाहिलेत. त्यामुळे लॉकडाऊनचा आग्रह कोणीही धरलेला नाही. स्वनिर्बंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. मास्क वापरणं आणि लसीकरण गरजेचं आहे. अनेकांनी लस घेतलेली नाही. लोक मास्कला झुगारून देताना दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन नाही, स्वत:वर निर्बंध महत्त्वाचे आहेत."
 
'लॉकडाऊन हा आता पर्याय असू शकत नाही'
लॉकडाऊनचा सर्वात वाईट परिणाम हा उद्योगजगतावर आणि पर्यायानं अर्थव्यवस्थेवर झाला. त्यातून आता हे क्षेत्र सावरत आहे. त्यामुळे नव्या व्हेरिएंटची काळजी जगभर पसरलेली असतांना आता पुन्हा निर्बंधांकडे तर जावं लागणार नाही ना या विचारानं उद्योगजगत धास्तावलं आहे. पण आता लॉकडाऊन हा पर्यायचं नसल्याचं उद्योगक्षेत्रातल्या तज्ज्ञाचं म्हणणं आहे.
'लॉकडाऊन हा आता पर्याय नाही आहे.पहिल्या दोन लाटांमध्ये आपण तो केला होता. त्यात आपण जे काही धडे घेतले आहेत, त्यातनं शिकून आता आपण पुढे जायला हवं. लॉकडाऊन कशा प्रकारचा, किती कठोर, असे प्रश्न असतात. मॅन्युफॅक्चरिंमधला लॉकडाऊन आता आपण करुच शकत नाही आणि करायलाही नको. जर दुस-या लाटेत एप्रिल-मे सारखा जर संसर्ग वाढला तरच सर्व्हिस सेक्टरसाठी त्याची तेव्हा चर्चा करायला हवी. आता मात्र त्या चर्चेची घाई नको. सारांश इतकाच की, लॉकडाऊनपेक्षा आपली सगळी ऊर्जा ही लसीकरण कसं पूर्ण होईल याच्यासाठी वापरायला हवी.जिथं लसीकरण झालं आहे तिथं प्रादुर्भाव आणि परिणाम कमी आहे," असं 'मराठा चेंबर ओफ कॉमर्स एंड इंड्स्ट्रीज'चे व्यवस्थापकीय संचालन प्रशांत गिरबने म्हणतात.
गिरबने यांच्या मते लॉकडाऊननंतर सावरत आता उद्योगक्षेत्र जवळपास पूर्वपदावर पोहोचलं आहे. तिथून त्यांना आता परत मागं जायचं नाही आहे.
"जर तिसरी लाट आली नाही तर भारताची अर्थव्यवस्था जानेवारी ते मार्च या तिमाहीत पुन्हा पूर्वपदावर येईल अशी चिन्हं आहेत. आम्ही मागच्या अठरा महिन्यांपासून दर महिन्याला पुणे विभागतल्या कंपन्यांना काही प्रश्न विचारून सतत एक सर्व्हे करतो आहोत. त्यातून असं दिसतं आहे की कोरोनापूर्वकाळाच्या तुलनेत आता जवळपास 91 टक्के उत्पादन पूर्वपदावर आलं आहे. काही मोठ्या कंपन्यातर ९५ टक्के उत्पादनापर्यंत पोहोचल्या आहेत. उत्पादनासारखीच जवळपास कर्मचारीसंख्या या कंपन्यांची आता पूर्वस्थितीत आली आहे. त्यामुळे तिसरी लाट जर आली नाही आणि लॉकडाऊन नसेल तर मार्चपर्यंत आपण पूर्वी ज्या स्थितीत होतो तिथं नक्की परतलेलो असू," गिरबने पुढे म्हणतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती