मालगाडी कठुआ ते होशियारपूरच्या उची बस्सी पर्यंत ताशी ७० किमी वेगाने धावली. याबाबतची माहिती मिळताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. मात्र, बऱ्याच प्रयत्नानंतर मालगाडी थांबवण्यात अधिकाऱ्यांना यश आले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी जम्मूच्या कठुआ रेल्वे स्टेशनवर मालगाडी उभी होती आणि तिचे इंजिन चालू होते. दरम्यान, लोको पायलट इंजिनमधून खाली उतरला. दरम्यान मालगाडी लोको पायलटशिवाय धावू लागली.
अधिकाऱ्यांनी प्रथम पठाणकोटमध्ये ते थांबवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून पठाणकोट रेल्वे स्थानकावरील मार्ग मोकळा करण्यात आला. याशिवाय पठाणकोटला जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. मुकेरियनजवळही मालगाडी थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. इथेही यश आले नाही. यानंतर उची बस्सीजवळ ट्रेन थांबल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.