दहशतवाद्यांनी लष्कराचा ट्रक पेटवला, 5 भारतीय सैनिकांचा मृत्यू
गुरूवार, 20 एप्रिल 2023 (23:54 IST)
जम्मू काश्मीर राज्यातील पूंछ इथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 5 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
या हल्ल्यामागे कट्टरतावाद्यांचा हात असल्याचं लष्कराने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
लष्कराच्या नॉदर्न कमांड मुख्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार दुपारी तीनच्या सुमारास लष्कराच्या वाहनांवर हँड ग्रेनेड फेकण्यात आले.
यामुळे या वाहनांना आग लागली. भिंबर गली आणि पूंछ दरम्यान या ट्रकची वाहतूक सुरू होती. पावसाचा प्रचंड जोर आणि कमी दृश्यमानता याचा फायदा कट्टरतावाद्यांनी उठवला.
या हल्ल्यामध्ये राष्ट्रीय रायफल्सचे पाच सैनिकांचा मृत्यू झाला. या भागात कट्टरतावाद्यांविरोधात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेचा भाग म्हणूनच या सैनिकांची नियुक्ती करण्यात आली होती.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार हल्ल्यात जखमी झालेल्या सैनिकावर राजौरी इथल्या रुग्णालयात उपचार सुरूआहेत.
हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचं लष्कराने म्हटलं आहे.