दहीहंडी उत्सवात थरावरून कोसळल्याने आतापर्यंत ३५ गोविंदा जखमी

गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (20:28 IST)
देशभरात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. दहीहंडीच्या उत्सवात उंचच्याउंच मनोरे रचणारे गोविंदा आपल्या जिवाची पर्वा न करता दहीहंडी फोडतात. या दहीहंडीच्या खेळाला सहासी खेळ म्हटलं जातं. यामध्ये दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. मात्र तरी देखील पुढल्यावर्षी त्याच जोमाने दहीहंडी फोडण्यासाठी उभे राहतात.अशातच आज देखील सकाळपासून आतापर्यंत एकूण ३५ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे
 
३५ गोविंदा जखमी झाल्याने यातील ४ गोविंदा रूग्णालयात भरती तर ९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यासह २२ गोविंदा ओपीडीमध्ये उपचार घेत आहेत. गोविंदाना या सहासी खेळात कोणतीही दुखापत झाल्यास त्यावर तातडीने उपचार करण्याच्या सोई शासनामार्फत करण्यात आल्या आहेत.
 
तसेच सर्व गोविंदांना विमा कवच देखील देण्यात आलं आहे. जखमी गोविंदांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी महापालिका देखील सतर्क आहे. पालिकेने शहरातील रुग्णालयातील १२५ खाटा राखीव ठेवल्यात. सायन रुग्णालयात १० खाटा, केईएममध्ये ७, नायर रुग्णालयात ४ आणि उर्वरित शहरांमध्ये तसेच मुंबईच्या उपनगरांमधील रुग्णालयात खाटा ठेवण्यात आल्यात.
 
गोविंदाच्या साहसी खेळामध्ये ९ ते १० थर रचले जातात. हे थर रचून दहीहंडी फोडली जाते. शहरांमध्ये चौकाचौकात राजकीय नेतेमंडळींकडून देखील मानाच्या दहीहंडी बांधल्या जातात. त्या फोडण्यासाठी हजारो आणि लाखोंचे बक्षिस ठेवले जाते.
 
गोविंदांच्या मनोरंजनासाठी कलाकार मंडळी देखील उपस्थित राहतात. अशा आनंदी सनाच्या दिवशी गोविंदांना दुखापत झाल्यास तातडीने उपचार मिळावा म्हणून बीएमसी हस्पिटलमध्ये १२५ खाटा तयार ठेवण्यात आल्यात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती