वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी, 12 जणांचा मृत्यू; 20 जखमी

शनिवार, 1 जानेवारी 2022 (08:45 IST)
जम्मू काश्मीर मधल्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी होऊन 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या इथे ही घटना घडली.
 
कटरा इथल्या वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत.
 

Injuries reported in a stampede at Mata Vaishno Devi Bhawan in Katra. Rescue operation underway: Police Control Room, Reasi pic.twitter.com/ex6vumreAF

— ANI (@ANI) January 1, 2022
रात्री 2.45 वाजता ही घटना घडली. सुरुवातीच्या वृत्तानुसार लोकांमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि ते एकमेकाला ढकलू लागले. यामुळे चेंगराचेंगरी झाली असं जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितलं.
 
सुरुवातीला मृतांची संख्या 6 असल्याचं सांगण्यात आलं. मात्र नंतर हा आकडा वाढला.
 
मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात येईल. जखमींना नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कटरा सार्वजनिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल दत्त यांनी सांगितलं.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैष्णोदेवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. "वैष्णोदवी मंदिरात घडलेल्या दुर्घटनेने अतिशय दु:खी झालो आहे. या घटनेत जीव गमावलेल्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
 
या घटनेत जीव गमावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत पंतप्रधान मदतनिधीतून देण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती