राज ठाकरे यांच्या आंदोलनावर आता थेट पंतप्रधानांनीही तोंडसुख घेतले आहे. जे लोक धर्म, जात वा जन्मभूमीच्या आदारावर समाजाचे विभाजन करू पाहतात, ते देशाच्या एकात्मतेत आणि प्रगतीत काहीच योगदान देऊ शकत नाहीत, अशी बोचरी टीका पंतप्रधानांनी राज यांचे नाव न घेता केली.
देशाची अखंडता विस्कटू पाहणार्या अशा शक्तींना व्यावहारीक मार्गाने व अतिशय विचारपूर्वक निपटायला हवे असे सांगून पंतप्रधान म्हणाले, की अशा विभाजनवादी मनोवृत्तीवर नियंत्रण घालणेही जरूरीचे आहे. कारण अशी वृत्ती देशात अस्थिरता निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.
ज्येष्ठ कॉंग्रेस नेते वसंत साठे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या देशातील समाज विविध मुद्दयांवर विभाजित झाल्यास, बाहेरच्या देशांपुढे आपली प्रतिमा एक मजबूत आणि ताकदवान देश अशी जाणार नाही.
ते पुढे म्हणाले, की भारताच्या प्रगतीत बाहेरचा अडसर नाही. पण घरच्या समस्या या प्रगतीत अडसर निर्माण करत आहेत. पण या सार्या प्रश्नांबरोबरच त्यांना तोंड द्यायची ताकदही आमच्यात आहे. भारतातील नागरिक विभाजनवादी मनोवृत्तीच्याच विरोधात कायम आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात राज ठाकरे व शिवसेना नेता उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणाचेही नाव घेतले नाही. पण त्यांचा इशारा त्यांच्याच दिशेने होता.