गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यात बोलत होते.
“आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे,” असे एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
“बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं, ते शिवसैनिक कधीही विसरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केल आहे, त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला,” असे आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.