यांच्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे चार फिरत्या लसीकरण केंद्रांद्वारे लसीचा डोस

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (08:11 IST)
मुंबईत तृतीयपंथी, फेरीवाले,एड्सग्रस्त,देहविक्रय करणाऱ्या महिला आदींना मुंबई महापालिकेतर्फे चार फिरत्या लसीकरण केंद्रांद्वारे लसीचा डोस देण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आणि व्हॅक्सिन ऑन व्हिल्स्,अमेरिकन इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
 
कोविड – १९ विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जास्तीत-जास्त नागरिकांचे जलद गतीने लसीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने निरनिराळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी ड्राइव्ह इन लसीकरण, अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण,गर्भवती महिलांचे लसीकरण असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतल्यानंतर आता त्यापुढे जाऊन फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत.
 
इच्छा असूनही काही अपरिहार्य कारणांनी लसीकरण केंद्रावर येऊन लस घेऊ न शकणाऱया तसेच कोविड संसर्गाची बाधा होण्याचा धोका असलेल्या दुर्लक्षित घटकांपर्यंत जाऊन त्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यामध्ये एचआयव्ही रुग्ण,नाईलाने देह विक्रय करुन उदरनिर्वाह करणाऱया महिला, तृतीयपंथी, बांधकाम कामगार, स्थलांतरित कामगार,रस्त्यावरील विक्रेते अशा विविध समाज घटकांपर्यंत पोहोचून, लसीकरणासाठी त्यांना आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करुन विनामूल्य लस देण्यात येणार आहे. पालिकेने प्रशासकीय विभागनिहाय अशा घटकांची यादी तयार केली आहे.त्यासाठी मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, पदपथावरील विक्रेत्यांची राष्ट्रीय संघटना तसेच इतर संबंधीत बिगर शासकीय संस्थांची मदत घेण्यात आली आहे.
 
या समाज घटकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रारंभी एकूण ४ फिरते लसीकरण केंद्र (मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट) सुरु करण्यात आले आहेत. प्रत्येक फिरत्या केंद्रामध्ये १ प्रशिक्षित डॉक्टर, २ परिचारिका, २ वैद्यकीय सहाय्यक, रुग्णवाहिका चालक उपलब्ध राहणार आहेत.त्यांना लॅपटॉप आणि वायफाय इंटरनेट सुविधा पुरविली जाणार आहे,जेणेकरुन कोविन संकेतस्थळावर नोंदणी करुन लसीकरणाची पुढील कार्यवाही करता येईल. आवश्यकतेनुसार अशा फिरत्या केंद्रांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती