मुंबईत खासगी सोसायट्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरु होणार

मंगळवार, 4 मे 2021 (16:27 IST)
मुंबईतील खासगी सोसायट्यांमध्येही लसीकरण केंद्र सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेने लसीचा साठा विचारात घेऊन खासगी रुग्णालयांना सोसायट्यांचा आवारात लसीकरण मोहिम सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र या रुग्णालयांना पालिकेने लसीकरणासाठी ठरवून दिलेले प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत. तसेच खासगी रुग्णालयांसाठी सरकारने ठरविलेल्या किंमतीवर या लसी सोसायटीतील सदस्यांना मिळणार आहेत.
 
यावर बोलताना, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (आरोग्य), सुरेश काकानी यांनी सांगितले की, हाऊसिंग सोसायट्या, औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या, बँका आणि कॉर्पोरेट्स क्षेत्रातील कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी खासगी रुग्णांसह टायअप करत खाजगी लसीकरण केंद्र सुरु करु शकतात. पालिकेने आत्तापर्यंत ७५ पेक्षा अधिक खासगी रुग्णालयांना सोसाट्यांमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी दिली आहे. परंतु खासगी रुग्णालयांना लसीकरणादरम्यान संबंधित सोसायट्यांमधील नागरिकांची लसीकरणानंतर डॉक्टरांचा निरीक्षणाखाली ठेवत योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच पालिकेने लसीकरणासाठी ठरवून दिलेल्या नियमांचे योग्य पालन करावे लागणार आहे.
 
दरम्यान ज्या नागरिकांना मोफत लस हवी आहे अशांसाठी पालिकेने २२७ नवीन केंद्रे सुरु केली आहेत. परंतु या केंद्रावर पुरेसा लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना विनामूल्य लस मिळणार आहे.
 
दरम्यान मुंबईतील लोढा ग्रुपने आपल्या प्रकल्पांतील अनेक सोसायट्यांमध्ये खासगी रुग्णालयांच्या माध्यामातून लसीकरण मोहिम सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती