मुंबईत तिसऱ्याच टप्प्याचे निर्बंध लागू राहणार

शनिवार, 12 जून 2021 (08:42 IST)
राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांचं वर्गीकरण ५ गटांमध्ये करण्यात आलं. पहिल्या गटापासून पाचव्या गटापर्यंत निर्बंध कठोर होत जातात. यामध्ये मुंबईचा समावेश सुरुवातील तिसऱ्या गटामध्ये करण्यात आला. पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी घटल्यास मुंबईचं दुसऱ्या किंवा पहिल्या गटामध्ये देखील वर्गीकरण होण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात शिस्तीचं पालन करून पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आणून देखील मुंबईत तिसऱ्याच टप्प्याचे निर्बंध लागू राहणार आहेत. मुंबई पालिकेकडून यासंदर्भातला निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
 
राज्य सरकारने जाहीर केलेल्या निकषांनुसार पाच टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी असल्यास अशी शहरं किंवा जिल्ह्यांचा समावेश अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात होऊ शकतो. मात्र, असं जरी असलं, तरी राज्य सरकारने फक्त हे निकष ठरवून दिले असून स्थानिक परिस्थितीनुसार त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. यानुसार आता मुंबई महानगर पालिकेने मुंबईसाठी निर्णय घेतला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती