माघी गणेशोत्सव दरम्यान, मुंबईतही रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत दादर येथे प्रसिद्ध श्रीसिद्धिविनायक गणपती (Siddhivinayak Temple) मंदिर आहे. या गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा केला जातोय. गणपती मंदिराच्या न्यास व्यवस्थापन समितीकडून महत्त्वाची माहिती देण्यात आलीय. गणपती मंदिराकडून उद्या मुंबईत भव्य रथयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या रथयात्रेत हजारो भाविकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे भाविकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तसेच मुंबईत काही कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी देखील ही महत्त्वाची बातमी आहे.
“दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव 22 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येतोय. येत्या बुधवारी म्हणजेच उद्या 25 जानेवारीला दुपारी साडेतीन वाजता श्रीसिद्धिविनायकाची रथयात्रा गणपती मंदिरातून निघणार आहे”, असं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.ही रथयात्रा श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर येथून एस. केत. बोले मार्ग, त्यानंतर पुढे गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग-काशीनाथ घाणेकर मार्ग, आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी मंदिर, वीर सावरकर मार्ग अशी फिरुन परत सिद्धिविनायक गणपती मंदिरात पोहोचेल.