मुंबईतील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या भावाविरोधात बलात्काराचा गुन्हा

बुधवार, 3 मार्च 2021 (07:56 IST)
मुंबईतील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या भावाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे.
 
सुनीत वाघमारे, असे आरोपीचे नाव आहे. सुनीत हे काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ आहेत. मुंबईच्या भोईवडा पोलीस ठाण्यात सुनीत वाघमारे विरोधात गुन्हा दाखल झाला करण्यात आला होता. परंतु, ही घटना लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये घडल्यामुळे या प्रकरणाचा गुन्हा लोणावळा शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीतने संबंधित 28 वर्षीय महिलेला नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिलं आणि फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिच्याशी मैत्री केली. तसेच तिचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअप चॅट आणि फोन कॉल सुरु झाले.
 
काही दिवस झाल्यानंतर पीडित महिलेकडे सुनीतनं आपलं तिच्यावर प्रेम असल्याचं म्हटलं. तसेच आपलं लग्न झालं आहे. मात्र आपला संसार नीट चालत नाही. त्याकरिता बायकोला घटस्फोट देणार आहे, असे सांगत पीडित महिलेला लग्न करण्याचे आश्वासन दिले.
 
आपला घटस्फोट होणार आहे आणि त्या संदर्भात आपल्याला वकील भेटायला येत आहेत. असे सांगत सुनीत त्या पीडित महिलेला लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. त्या हॉटेलमध्ये सुनीत वाघमारे यांनी पीडित महिलेवर अतिप्रसंग केला, असे सदर महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच दोघे काही दिवस ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये सुद्धा राहिले होते असंही तिनं म्हटलं आहे.
 
याप्रकरणी पीडित महिलेने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने तेथे गुन्हा दाखल करून तो तपासाकरिता लोणावळा शहर पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे.दरम्यान, सुनीत याला अटक करण्यात आली असून 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती