महाराष्ट्रात मध्यप्रदेशसारखी स्थिती ओढवणार नाही

गुरूवार, 12 मार्च 2020 (13:20 IST)
ज्योतिरादित्य शिंदे यांनी बंड केल्याने मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपचे ऑपरेशन लोटस सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मध्यप्रदेशात पडसाद उमटले असले तरी महाराष्ट्रातील स्थिती उत्तम आहे. महाराष्ट्रात मध्यप्रदेशसारखी स्थिती ओढवणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. पवार यांनी बुधवारी विधानभवनात येऊन राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरला.
 
त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी वेगवेळ्या विषयांवर मु्रत संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्य्रत केली. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ हे सक्षम आहेत. त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. मात्र, मध्यप्रदेश सरकारबाबत साशंकता आहे. कमलनाथ काही करतील का? हे पाहावे लागेल, असे सांगतानाच काँग्रेसने ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असे मत पवार यांनी व्यक्त केले. तसेच काँग्रेसमध्ये नेतृत्व, कर्तृत्व आणि भविष्यही असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.
 
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्णझाले आहेत. त्यामुळे या सरकारला तुम्ही किती मार्क द्याल ? असा सवाल त्यांना करण्यात आला. तेव्हा राज्य सरकारला शंभर टक्के गुण देईन, असे पवार म्हणाले. हे तीन पक्षाचे सरकार आहे आणि शंभर दिवस चालले. त्यामुळेच या सरकारला शंभर टक्के गुण देईल, असे पवारांनी सांगितले. यावेळी त्यांनी मनसेच्या शॅडो कॅबिनेटवरही प्रतिक्रिया दिली. सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेट तयार केली असेल तर त्याचे स्वागतच आहे. त्यांनी चांगले काही तरी केले पाहिजे. लोकांसमोर चांगले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले. आयपीएलसाठी होणारी गर्दी टाळली पाहिजे, असे सांगतानाच शक्यतो सभा, मेळावे टाळा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 
 
दरम्यान, पवार यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित राज्यसभेसाठी अर्ज भरला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. दरम्यान, राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार, 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 4, तर भाजपचे 3 उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी2 तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती