चोरी केल्याप्रकरणी दोन अभिनेत्रींना अटक

शुक्रवार, 18 जून 2021 (16:09 IST)
मुंबईतील गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. या दोन्ही अभिनेत्री ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या गुन्हेविषयक मालिकांमध्ये काम करतात. या अभिनेत्रींची चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तब्बल तीन लाख रुपयांची चोरी केल्याप्रकरणी त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
या दोन्ही आरोपी अभिनेत्रींनी प्रसिद्ध टेलिव्हिजन शो क्राईम पेट्रोल आणि काही अन्य शोमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कोरोना काळात मालिकांचे शुटिंग बंद असल्याने पैशाची चणचण जाणवत असल्याने या दोघांनी चोरीचा मार्ग निवडला. या दोघांचा  एक मित्र गोरेगाव आरे कॉलनीमध्ये पेइंग गेस्ट चालवतो. आरे कॉलनीतील रॉयल पाम या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात १८ मे रोजी त्या पेईंग गेस्ट म्हणून गेल्या. दरम्यान या पेइंग गेस्टमध्ये आधीपासून एक तरुणी राहत होती. त्या तरुणीचे तीन लाख रुपये या दोघींनी चोरी करुन पोबारा केला. तब्बल ३ लाख २८ हजार रुपये दोघांनी चोरले. परंतु पैसे चोरी करुन इमारतीतून बाहेर पडताना या दोघी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या. त्यानंतर संबंधित तरुणीच्या चोरीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती