मदर्स डे : कोरोना रुग्णांवर सहा महिन्यांची गरोदर असतानाही उपचार करणारी कोव्हिड योद्धा

रविवार, 9 मे 2021 (10:28 IST)
"बाळ पोटात असल्यापासून आई बाळावर गर्भसंस्कार करते. आता मी जे काही करतेय, ते बाळाला शिकायला मिळेल. तो आयुष्याची खडतर वाट आणि येणारी आव्हानं पेलण्यासाठी तयार होईल"
 
सहा महिन्यांच्या गर्भवती डॉ. रूपाली अंगारख-मोहिते कोव्हिडयोद्धा आहेत. रुग्णांसाठी आपलं कर्तव्य तसूभरही न विसरता, जीव धोक्यात घालून त्या न थकता, न डगमगता रुग्णसेवा करत आहेत.
 
आई होणारी प्रत्येक महिला गरोदरपणात आपली आणि बाळाची जीवापाड काळजी घेते. मग, तुम्हाला कोव्हिड सेंटरमध्ये भीती वाटत नाही का, असं विचारल्यावर डॉ. रुपाली म्हणतात, "गरोदर असताना काम करण्याची भीती आहेच. पण, मी डॉक्टर आहे. रुग्णसेवा माझं कर्तव्य आहे, याची मला जाणीव आहे."
कोरोना संसर्गात पहिल्या दिवसापासून डॉ. रुपाली काम करतायत. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या गौरी हॉल कोव्हिड सेंटरमध्ये त्या कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत.
 
कोव्हिड-19 विरोधातील लढाई एक युद्ध बनली आहे. जगभरातील आरोग्य कर्मचारी या युद्धात सामान्यांची ढाल बनलेत. डॉ. मोहिते सांगतात, "बाहेर युद्ध सुरू असताना सैनिकाने घरात बसून कसं चालेल. आपण जगतोय तर काहीतरी चांगलं केलं पाहिजे. "
बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. रूपाली दिवसभराचं काम संपवून थोड्या रिलॅक्स झाल्या होत्या. कोव्हिड ड्युटी, टेलिफोनवरून रुग्णांचं कन्सल्टेशन केल्यानंतर रात्री साडेनऊला त्यांना थोडी उसंत मिळाली होती.
 
'हे बाळाचं ट्रेनिंग आहे'
तज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी आपल्यासोबत राहणार आहे.
 
डॉ. रूपाली मोहिते म्हणतात, "बाळ जन्माला आल्यानंतर त्याला खूप आव्हानांचा सामना करायचा आहे. बाळाला आव्हानं पेलण्याचं ट्रेनिंग मी आत्तापासून देऊ शकले तर आई म्हणून यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल. हा काळ बाळाच्या ट्रेनिंगचा भाग आहे."
 
कोव्हिड सेंटरमध्ये डॉ. रूपाली रोज आठ तासांची ड्युटी करतात. डॉक्टरांनी एकदा पीपीई किट चढवलं की तासन् तास पाणी नाही की खाणं नाही.
मग, तुमच्या मनात धोका असल्याचा विचार आला का, या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणतात, "हो. धोका किती आहे. पुढे काय होईल. हा विचार मनात आला. पण, कोरोना संसर्ग घरात बसलो, तरी होतोय. भीती मनात घेऊन घरी बसले तर चुकीचं आहे, असा विचार करून मी पुन्हा कामाला लागले."
 
कोव्हिडवर मात
डॉ. रुपाली चार महिन्यांच्या गरोदर असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.
 
त्या म्हणतात, "मला आणि कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली होती. पण, मी तयार होते. माझा स्वत:वर विश्वास होता. संसर्ग झाला तरी मी यातून बाहेर पडेन, यासाठी मनाने खंबीर होते."
या आजाराचे होणारे भावनिक आणि शारीरिक परिणाम डॉ. रूपाली यांनी जवळून अनुभवले आहेत. त्या सांगतात, "रुग्ण भावनिक ताणतणावाचा सामना करत असतात. शारीरिक ताण झेलणं शक्य नसतं. मला त्यांना धीर देता येतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे."
 
गरोदरपणामुळे येणाऱ्या मर्यादा
गर्भारपणात काम करण्यात शारीरिक मर्यादा येतात. यावर बोलताना डॉ. रुपाली म्हणतात, "बाळाची ग्रोथ होत असते. त्यामुळे स्टॅमिना आणि एनर्जी कमी पडते. शारीरिक मर्यादा नक्कीच असते. पण, गर्भवती आहे म्हणून काहीच जमणार नाही असं नाही. मी योग्य काळजी घेऊन काम करते."
 
"लोक खचून जातात. संसर्गावर मात करण्यासाठी इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे. मनातील विचारांवर शरीर अवलंबून असतं," असं त्या म्हणतात.
 
आई होणार कळल्यानंतर कोव्हिड वॉर्डमध्ये जाताना दडपण आलं?
डॉ. रुपाली सांगतात, "मी प्रेग्नंट असल्याचं कळल्यानंतर मी खूप आनंदात होते. खरं सागायचं तर मी जास्त आनंदाने रुग्णालयात गेले. मला सर्वांना सांगायचं होतं...मी आई होणार आहे."
 
"थोडी चिंता मनात नक्की होती. उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाली तर? गर्भवती असताना एका मर्यादेनंतर काही औषधं घेता येत नाहीत. कोरोनामध्ये गुंतागुंत निर्माण झाली असती तर औषध नाहीत. त्यामुळे एकच चिंता होती गुंतागुंत निर्माण व्हायला नको," डॉ. रुपाली म्हणतात.
 
रुग्णांसोबतचं भावनिक नातं
डॉ. रुपाली म्हणतात, "आई होणार असल्याने मी जास्त भावनिक झाले आहे. त्यामुळे रुग्णांसोबत भावनिक नातं निर्माण झालंय. पूर्वी एक डॉक्टर म्हणून रुग्णाकडे पहायचे. पण आता दृष्टिकोन बदललाय."
 
"जसं पोटातल्या बाळाशी कनेक्ट होतीये, तसंच रुग्णांशी कनेक्ट झाले आहे. "
 
बाळाचा जीव धोक्यात घालतोय असा मनात विचार आला?
 
"नाही. कोरोना संसर्ग घरी, बाहेर किंवा रुग्णालयात केव्हाही होऊ शकतो. त्यामुळे असा विचार अजिबात आला नाही. कोव्हिड झाल्यानंतर तपासणी केली. बाळ एकदम चांगलं आहे," रुपाली म्हणतात
 
गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी?
गर्भवती असल्याने तुम्ही काय काळजी घेत आहात, अशा महिलांनी काय करायला हवं, हे विचारल्यावर डॉ. रुपाली सांगतात, " गर्भवती महिलांनी पौष्टिक अन्नाचं सेवन केलं पाहिजे. योग्य आहार, शरीरातील पाण्याची मात्रा कमी होता कामा नये. आराम फार महत्त्वाचा आहे. आहारात प्रोटीनचं प्रमाण अधिक ठेवा.
 
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषध घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, स्ट्रेस कामाच्या ठिकाणी सोडून या. घरी आणू नका. योग, मेडिटेशन करा आणि मन प्रसन्न ठेवा. लक्षणं अंगावर काढू नका. आपल्याला दुखणं अंगावर काढण्याची सवय झालीये. आई म्हणून तुमचं कर्तव्य आहे, बाळासाठी. त्यामुळे लगेच डॉक्टरकडे जा. गरोदर असताना विकनेस, ताप, सर्दी वाटली तर तात्काळ डॉक्टरकडे जाऊन उपचार करा."
'मी बाळाशी केसेस डिस्कस करते'
"मी वेळ मिळेल तेव्हा बाळाशी गप्पा मारते. कोव्हिड सेंटरमध्ये असताना मनात काही गोष्टींचा विचार सुरू असतो. मग बाळाशी बोलते. काही रुग्णांबद्दल डिस्कस करते," डॉ. रुपाली म्हणतात.
 
गरोदरपणा आणि पीपीई किट
 
पीपीई किट घालून वावरणं कठीण आहे. मग गरोदर असताना पीपीईमध्ये आठ तास कसे घालवता? असं विचारल्यावर डॉ. रुपाली अंगारख-मोहिते म्हणतात, "रुग्णालयात पोहोचण्याआधी एक-दीड लीटर पाणी पिते. ब्रेकफास्टमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पाच-सहा तास भूक लागत नाही. पण, मध्येच बरं वाटत नसेल तर थोडा ब्रेक घेते."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती