गंगेतील मृतदेहांबाबत मोहन भागवतांनी भाष्य करावे; संजय राऊतांचे आवाहन

मंगळवार, 25 मे 2021 (19:40 IST)
गंगा नदीत मृतदेहांचा खच आढळून आला आहे. या मुद्द्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. गंगा नदीत मृतदेह सापडले. राम मंदिरा इतकाच हा महत्त्वाचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे भागवत यांनी त्यावर बोलावं, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
 
संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना हे आवाहन केलं. भागवत हे आदरणीय आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. त्यांनी परखडपणे मत व्यक्त करावं, अशी आमची अपेक्षा आहे. त्यांच्या मताला देशात आजही महत्त्व आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून सगळेच गप्प आहेत. विशेषत: गंगेच्या प्रवाहात हजारो मृतदेह वाहून आले. त्यांच्यावर धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार झाले नाहीत. हा विषय हिंदुत्वाचा होता. राम मंदिरा इतकाच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर देशातील हिंदुत्ववादी नेत्यांनी आपली भूमिका मांडली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा होती. मोहन भागवत यांनीही त्यावर भाष्य केलं पाहिजे. भागवत यांनी या मुद्द्यावर बोलावं, असं मी त्यांना आवाहन करतो, असं राऊत म्हणाले.
 
विधान परिषद सदस्यांची यादी सापडली ही आनंदाची गोष्ट आहे. त्यावर राज्यपालांनी सही केली तर संपूर्ण राजभवनात आम्ही पेढे वाटू, असा चिमटा काढतानाच फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवली नाही. बरं भूतं असली तरी ती त्यांच्या आसपासचीच असतील, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
 
राज्यपाल त्या फायलीवर का सही करत नाहीत? ती काय बोफोर्सची फाईल आहे का? की कुठल्या भ्रष्टाचाराची फाईल आहे? असा सवाल करतानाच सहा-आठ महिने झाले तरी या फायलीवर सही होत नाही. हे महाराष्ट्राच्या गतीमान प्रशासनाच्या कारभाराला शोभणारं नाही. राज्यपालांनी ही गतिमानता दाखवावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती