मृतदेहांची ओळखही पटेना! समुद्रात सापडेल्या कर्मचाऱ्यांच्या मृतदेहांची केली जाणार डीएनए चाचणी

शनिवार, 22 मे 2021 (16:12 IST)
तौते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ’ अर्थात ओएनजीसीच्या विहीरवर तेल उत्खनन करणाऱ्या पी-३०५ तराफा बुडाला. या तराफ्यावरील ६१ जणांचे मृतदेह नौदलाला शोध मोहिमेदरम्यान मिळाले असून, वेदनादायी बाब म्हणजे पाण्यात सडायला लागल्याने काही मृतदेहांची ओळख पटवणंही अवघड होऊन बसलं आहे. त्यामुळे या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणी केली जाणार आहे. ‘पी ३०५’ तराफा समुद्रात बुडून झालेल्या दुर्घटनेतील २६ मृतदेहांची शुक्रवारी रात्रीपर्यंत ओळख पटविण्यात आली होती. त्यातील हे सर्व मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले, तर २३ मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यांची ओळख पटविणे अवघड आहे.
 
मृतांचे डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटविल्यानंतर हे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले जातील, अशी माहिती पोलिसांनी दिली. ‘हवेचा रोख आणि समुद्राची स्थिती पाहून बचावकार्य सुरू आहे. सध्या खंबातच्या खाडीपर्यंत नौदलाच्या आठ युद्धनौका आणि तटरक्षक दलाच्या ७ जहाजांमार्फत शोधमोहीम सुरू आहे. नौदलाची हेलिकॉप्टर आणि टेहळणी विमानेही शोध घेत आहेत. सुमारे १८० ते २०० मैल लांब आणि ६० ते ७० मैल रुंद परिसरात मदतकार्य सुरू असून आणखी काही नौका शोधमोहिमेत सहभागी होणार आहेत,’ असे नौदलाचे अधिकारी मनोज झा यांनी सांगितले. वरप्रदा आणि ‘पी ३०५’वर पाहणी केली जाईल व आणखी काही मृतदेह आहेत का याची तपासणी करण्यात येईल. ‘पी ३०५’ बुडाल्याचे ठिकाण सापडले आहे. वरप्रदा बुडालेले ठिकाण अद्याप सापडले नाही. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष जहाज मागविण्यात आले आहे, असेही झा म्हणाले.
 
वरप्रद नौकेचं काय झालं?
 
चक्रीवादळाच्या तडाख्यात वरप्रदा ही तेलफलाट खेचून नेणारी नौकाही (सपोर्ट व्हेइकल) बुडाली असून, त्यावरील ११ कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. या नौकेवरील २ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात सोमवारीच (१७ मे) नौदलाच्या जवानांना यश आले होतं. या नौकेनं ‘पी ३०५’ हा तराफा खेचून समुद्रात एका ठिकाणी रविवारी आणून सोडला. त्यानंतर तेथून काही अंतरावर वरप्रदा नौकाही नांगर टाकून उभी करण्यात आली. सोमवारी पहाटेच्या सुमारास या नौकेचे नांगर तुटले. चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केल्यानं नौकेच्या कप्तानचे त्यावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही नौका समुद्राच्या लाटांबरोबर वाहू लागली. या नौकेवरून सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कंपनीशी शेवटचा संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर काही काळाने ही नौका उलटली. नौदलाची आयएनएस कोलकाता ही युद्धनौका ‘पी ३०५’ या तराफ्यावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी निघालेली असताना समुद्रात २० किलोमीटर अंतरावर युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांना दोघे जण बुडताना आढळून आले. आयएनएस कोलकाताने या दोन कर्मचाऱ्यांना युद्धनौकेवर घेतल्यावर वरप्रदा बुडाल्याची माहिती समोर आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती