मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकरांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून धमकी

शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (17:44 IST)
Photo : Twitter
एका अज्ञात व्यक्तीकडून नार्वेकर यांना व्हॉट्सअपवर (whatsapp) धमकी देण्यात आली आहे. या व्यक्तीने त्यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे मिलिंद नार्वेकर यांनी तक्रार केली आहे. याचा तपास मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला असून चौकशी सुरु आहे.
 
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला. यात आपल्या काही मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आहे. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी धमकी या व्यक्तीने दिली आहे.
 
मिलिंद नार्वेकर यांनी हा मेसेज मिळताच मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. नार्वेकर शिवसेनेचे सचिव असून ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत. ठाकरे परिवाराचे विश्वासू मानल्या जाणाऱ्यांपैकी त्यांचे नाव आघाडीवर आहे.
 
मिलिंद नार्वेकर यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडे (Crime Branch) याचा तपास सोपवण्यात आला आहे. पोलीस या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती