गांधी जयंतीनिमित्त 'ड्राय डे' असतानाही मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील मेन्शन नावाच्या क्लबमध्ये बिनदिक्कतपणे दारुविक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहारा स्टार हॉटेलमधील मेन्शन (Mansion) नावाच्या क्लबमध्ये दारुविक्री सुरू असून चक्क क्लबकडून 'नो ड्राय डे' नावानं जाहिरातबाजी देखील करण्यात आली होती. या जाहिरातीमुळे क्लबमध्ये तळीरामांनी चांगलीच गर्दी केली होती. इतकंच नव्हे, तर कारवाईचा बडगा टाळण्यासाठी क्लबनं चलाखीनं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलवर उद्याची म्हणजेच ३ ऑक्टोबरची तारीख नमूद केली जात आहे.
क्लबकडून केल्या जाणाऱ्या या नियमभंगाची माहिती महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी दिली आहे. तसंच त्यांनी पुरावा म्हणून क्लबचं बिलही शेअर केलं आहे. "आज महात्मा गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण देशात ड्राय डे असूनही मुंबईतील हॉटेलमध्ये बिनधास्तपणे दारुविक्री केली जात आहे. काही पैशांसाठी तुम्ही राष्ट्रपित्याचा अपमान करत आहात आणि महाराष्ट्र युवक काँग्रेस हे अजिबात सहन करणार नाही. आज दोन तारीख असूनही मला तीन तारखेचं बिल देण्यात आलं आहे. तसंच बिलावर नमूद करण्यात आलेला जीएसटी क्रमांकही हॉटेलशी मॅच होत नाही. आता याची राज्याचं उत्पादन शुल्क विभाग दखल घेणार का?", असा सवाल अक्षय जैन यांनी उपस्थित केला आहे.